यूट्यूबरने लांबलचक सोशल मीडिया पोस्टद्वारे मानले त्यांना वाचवणाऱ्या आयपीएस अधिकारी, त्यांची पत्नी आणि आपल्या फॉलोअर्सचे आभार.
पणजी : नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात पर्यटकांचे मोठ्याप्रमाणावर आगमन झाले आहे. किनारी भाग पर्यटकांच्या उपस्थितीमुळे गजबजलेला असल्याचे दृष्टीस पडत आहे. दरम्यान कळंगूट समुद्रात बोट उलटून १ जण ठार झाल्याची बातमी उजेडात आली होती.
याच दरम्यान सायंकाळी गोव्यातील सासष्टी येथील माजोर्डा समुद्र किनारी प्रसिद्ध यूट्यूबर 'बियर बायसेप्स' रणवीर अलाहबादिया आपल्या जोडीदारासोबत पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या प्रवाहात अडकले व बुडू लागले. ५-१० मिनिटे त्यांनी पाण्यातून बाहेर येण्यासाठी संघर्ष केला, पण पाण्याच्या प्रवाहासमोर त्यांचे काही चालले नाही. पण येथे उपस्थित एका आयपीएस अधिकाऱ्याने व त्याच्या पत्नीने या दोघांचे जीव वाचवले.
जेव्हा रणवीर आणि त्याच्या मैत्रिणीला समजले की प्रवाहात अडकलेत व आता खोलवर ओढले जात आहेत आणि ते बाहेर पडू शकत नाहीत, तेव्हा त्यांनी मदतीसाठी हाक मारली. जवळच पोहणारे दाम्पत्य त्यांच्या मदतीला आले. यातील पुरुष हे आयपीएस अधिकारी आणि त्यांची पत्नी, एक आयआरएस अधिकारी होती. दोघांनी मिळून रणवीर आणि त्याच्या मैत्रिणीचा जीव वाचवला. या घटनेनंतर रणवीरने मनापासून कृतज्ञता व्यक्त करत हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. रणवीरने हा भावूक प्रसंग आपल्या इस्टाग्रामवर शेअर केला. या पोस्टमध्ये तो म्हणतोय ' मी आणि माझी गर्लफ्रेंड, आम्ही दोघे चांगले पोहणारे आहोत. पण निसर्गाची ताकदच इतकी आहे की येथे तुमच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांची कसोटी लागतेच.
'आज मी माझ्या सर्व फॉलोअर्सचा खूप आभारी आहे. ही घटना मला जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्यास भाग पाडत आहे.' असेही पुढे रणवीर अलाहबदियाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.