गोव्यात ८० ते ९० टक्के बूथवर पाहतात मन की बात कार्यक्रम
पणजी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा लाभ आता सर्वत्र दिसू लागला आहे. गोव्यात ८० ते ९० टक्के बूथवर मन की बात कार्यक्रम पाहिला जातो. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दलची भीती दूर होण्यास मदत झाली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
पर्वरी येथे मंत्रालयात डॉ. आश्विन फर्नांडिस यांनी लिहिलेल्या 'मोदीलोग' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. या प्रकाशन सोहळ्याला पुस्तकाचे लेखक डॉ. आश्विन फर्नांडिस उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बाद' कार्यक्रमाने एक प्रकारचा विक्रम केला आहे. या कार्यक्रमाच्या आधारे जनतेशी संवाद साधणारे ते पहिले प्रधानमंत्री आहेत. 'मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल, फिट इंडिया मूव्हमेंट, स्वच्छ भारत अभियान, आत्मनिर्भर भारत' यांसारख्या अनेक उपक्रमांची माहिती पंतप्रधानांनी 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे दिली.
देशातली विविधता, स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान, स्वातंत्र्य चळवळीतील अनामिक हुतात्मे, तसेच संस्कृतीची माहिती जनतेला मन की बात कार्यक्रमामुळे मिळाली. मन की बात कार्यक्रमामुळे एक प्रकारची जागृती होण्यास मदत झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. आश्विन फर्नांडिस यांचे 'मोदीलोग' पुस्तक 'मन की बात' व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भारताबद्दलच्या व्हिजनवर आधारित आहे. गोव्यातील स्टॉल्सवर हे पुस्तक उपलब्ध असेल.