म्हापसा : भाटी-गोवा वेल्हा येथे कारची एका घराच्या संरक्षण भिंतीला धडक बसल्याने झालेल्या स्वयं अपघातात फ्रान्सिस ब्राझांका (४३, फोर्गोटेवाडो, गोवा वेल्हा) या कार चालकाचा मृत्यू झाला. तर दामोदर आर्लेकर (रा. गोवा वेल्हा) हा सहप्रवासी किरकोळ जखमी झाला.
हा अपघात बुधवारी २५ रोजी पहाटे ४ च्या सुमारास घडला. भाटी येथे फ्रान्सिस व दामोदर हे नाताळ सणानिमित्त आयोजित मित्रांच्या पार्टीत सहभागी झाले होते. पार्टीतून ते पहाटे घरी चालले होते. वाटेत फ्रान्सिस याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारची धडक रस्त्याच्या बाजूच्या एका घराच्या संरक्षण भिंतीला बसली. या अपघातात चालक फ्रान्सिस गंभीर जखमी झाला तर कारमध्ये बाजूला बसलेला सहप्रवासी दामोदर आर्लेकर हा किरकोळ जखमी झाला. दोघांनाही येथील स्थानिकांनी लगेच गोमेकॉत उपचारार्थ दाखल केले. उपचार दरम्यान फ्रान्सिस याचा मृत्यू झाला. तर दामोदर यास डॉक्टरांनी उपचारानंतर घरी पाठवले.
अपघाताचा पंचनामा आगशी पोलिसांनी केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.