उद्घाटन झाल्यापासून ३-४ दिवसांत तब्बल १२ अपघात याठिकाणी घडल्याची स्थानिकांची माहिती
मडगाव : नव्या मडगाव वेस्टर्न बायपासवर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. गुरुवारी सकाळी कार व दुचाकीत अपघात झाला व एकजण जखमी झाला.मडगाव येथील नव्याने मानण्यात आलेल्या वेस्टर्न बायपास वर अपघात होण्याच्या घटना कायम आहेत मागील तीन ते चार दिवसात छोटे-मोठे असे १२ अपघात घडल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मडगाव, नावेली शहरातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने वेस्टर्न बायपासचे उद्घाटन करण्यात आले होते.
आज गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा या ठिकाणी अपघाताची घटना घडली. तळेबांध बाणवली येथील अंडरपासमधून अंतर्गत रस्त्यावर वळण घेणार्या टॅक्सीची व समोरुन येणार्या दुचाकीची धडक झाली. यात दुचाकी कारच्या खाली आली व दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी रुग्णवाहिका बोलावून जखमीला इस्पितळात दाखल केले. या अपघातानंतर बाणावली परिसरातील स्थानिक नागरिकांनी वेस्टर्न बायपास बांधकामातील इंजिनिअरिंगमध्ये अनेक त्रुटी आहेत त्याचा फटका आता वाहनचालकांना बसत असल्याचे सांगितले.
स्थानिक वॉरन आलेमाव यांनी सांगितले की, मडगाव वेस्टर्न बायपासची सुरुवात करण्यात आल्यापासून मुख्य रस्त्यासह बगलमार्गांवर अपघात घडत आहेत. मागील चार दिवसांत सुमारे १२ अपघात घडले व काहींना दुखापत झाली तर काही गाड्यांचेही नुकसान झालेले आहे. वेस्टर्न बायपासवरील एसजीपीडीए मार्केटनजिक, तळेबांध अंडरपासनजिक व मार्कादो मॉलनजिक अशा तीन ठिकाणी वाहनांचे अपघात घडत आहेत. यामुळे राज्य सरकारकडून या अपघातांची दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी केली.
मडगाव वेस्टर्न बायपासचे उद्घाटन दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते व त्याच दिवशी रात्री या महामार्गावर पहिल्या अपघाताची नोंद झाली. वेस्टर्न बायपासवरुन प्रवास करणार्या कारची धडक क्रेनला बसल्याने अपघात घडला व कारमधील प्रवाशांना दुखापत झाली होती. या अपघातापासून या मार्गावर किरकोळ अपघात होत आहेत.