तिघे दुचाकीस्वार गंभीर. उपचारार्थ गोमेकॉत दाखल
पणजी : राज्यात अपघातांचे शुक्लकाष्ठ सुरूच असल्याचे दृश्य दिसत आहे. जुन्या मांडवी पुलावर एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. रेंट अ कॅबने चुकीच्या लेनमध्ये जात समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना ठोकरले. या अपघातात तिघा दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गोमेकॉत उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये संदेश नाईक (रा. पणजी), यश भुतानी (रा. मूळ राजस्थान) व फारूख अन्सारी (रा. पिळर्ण) यांचा समावेश आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हा अपघात शनिवारी पहाटे च्या सुमारास घडला. युहान मॅथीव ( रा. शिवोली व मूळ दिल्ली) हा युवक जीए ०३ डब्ल्यू ७९१८ क्रमांकाची रेन्ट अ कॅब आयटेन गाडी घेऊन पणजीहून पर्वरीच्या दिशेने जात होता. तर विरूध्द दिशेने जीए ०२ एडी २०३२ या अॅक्टीवा स्कुटरवरून संदेश नाईक, जीए ०३ एएन ४१८८ या ज्यूपीटर स्कुटरवरून फारूख अन्सारी व आर जे २८ ईएस १४८९ या बुलेटवरून यश भुतानी हे तिघे दुचाकीस्वार चालले होते. अपघातग्रस्त कार चालकाचे मांडवी जुन्या पुलावर मालीमच्या बाजूने पोहोचताच गाडीवरील नियंत्रण सुटले व चुकीच्या दिशेने जात प्रथम अॅक्टीवा व त्यानंतर इतर दुचाकींना कारची ठोकर दिली.
या अपघातात तिघेही दुचाकीस्वार जखमी झाले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारार्थ गोमेकॉत हलविण्यात आले. उपचारार्थानंतर फारूख व यश यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर संदेश नाईकवर उपचार सुरू आहेत. पर्वरी पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच हवालदार संदीप घोडगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच कार चालक युहान मॅथीव याची म्हापसा जिल्हा इस्पितळात अल्कोहोल चाचणी घेण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
एका माहितीनुसार, राज्यात १ डिसेंबर ते २६ डिसेंबर २०२४ या कालावधीत २०४ अपघात झाले होते. यातील १४ भीषण अपघातांत १४ जणांना जीव गमावला. ४४ अपघातांत ५१ जणांना गंभीर दुखापत झाली. ५४ किरकोळ अपघातांत ६१ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. याशिवाय ९२ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वरील कालावधीत २०२३ मध्ये २२७ अपघात झाले होते. १६ भीषण अपघातांत १८ जणांना जीव गमवावा लागला होता. याशिवाय ३४ अपघातांत ४६ जणांना गंभीर दुखापत झाली होती. ५६ किरकोळ अपघातांत ७२ जणांना दुखापत झाली होती. १२१ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.
दरम्यान राज्यात अपघातांचा ससेमिरा सुरूच आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, रस्त्यावरील खड्डे, वळणाचा अंदाज न आल्याचे गाडीचा अपघात, किंवा दारूच्या नशेत गाडी चालवणे तसेच गाडीत उद्भवलेले तांत्रिक बिघाड यासारख्या गोष्टींमुळे राज्यात सर्रास दुर्घटना घडतात.