गोवा पोलीसांकडून किनारी भागात सुमारे ३ हजार पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची तैनाती
पणजी : राज्यातील किनारी तसेच इतर भागात मोठ्या प्रमाणात नवीन वर्षाचा स्वागतासाठी पार्ट्या तसेच इतर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होणार नाही, याची खात्री करण्यासाठी गोवा पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यासाठी राज्यात १२ श्वान पथकांसह ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे. याशिवाय गोवा पोलीस, अग्निशमन दल तसेच राज्यातील इतर विभागातील मिळून सुमारे ३ हजारहून जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्याची तैनाती केली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह ९ श्वान पथकासह ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. अमली पदार्थ तस्करांवर नजर ठेवण्यासाठी तीन श्वानांचा वापर करण्यात येणार आहे. राज्यातील किनारी परिसरातसह रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजारपेठ तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी लावून तपासणी केली जाणार आहे. या काळात मद्यपी चालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष मोहिम हाती घेतली आहे. चोख बंदोबस्तासाठी गोवा पोलिसांनी भारतीय रिझर्व बटालियन (आयआरबी) व इतर विभागाच्या पोलिसांच्या मदतीने पूर्ण जबाबदारी हाती घेतली आहे. त्यासाठी चार भारतीय रिझर्व बटालियनचे प्लॅटूनसह इतर कर्मचारी मिळून सुमारे दोन हजार पोलीस व इतर विभागातील कर्मचारी तैनात केले आहेत. या व्यतिरिक्त अग्निशामक दलाचे कर्मचारी, तर १०८ जीव्हीके इएमआरआय रुग्णवाहिकेची कर्मचारी व इतर आपत्कालीन यंत्रणेचे ५०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
याशिवाय वाहतूक व्यवस्थांसाठी वाहतूक पोलीस आणि गृहरक्षक तैनात केले आहे. भारतीय रिझर्व बटालियनचे (आयआरबी) २ पुरुष आणि २ महिला मिळून चार प्लॅटून तैनात केले आहे. तसेच गोवा पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब निकामी पथक (बीडीएस), जलद कृती दलाचे पोलीस, वाहतूक विभागाचे पोलीस तसेच विशेष विभागाचे पोलिस व इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा यंत्रणेसाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच ध्वनी प्रदूषण नियमाची चाचणी करण्यासाठी गोवा प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून (जीएसपीसीबी) ठीकठिकाणी रिअल-टाइम ध्वनी निरीक्षण प्रणाली (real-time noise monitoring system) उभारण्यात येणार आहे. याशिवाय कायदा व सुव्यवस्थेसाठी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यात कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांची विक्री किंवा सेवन होणार नाही, याची खात्री करण्यासाठी गोवा पोलिसासह अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) खबर कसली आहे. त्यासाठी अमली पदार्थ पथक तीन श्वान पथकासह ड्रग्स डिटेक्शन किटचा वापर करणार आहे.
- टिकम सिंग वर्मा, पोलीस अधीक्षक - एएनसी
नो पार्किंग’ परिसर
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून किनारी परिसरात ‘नो पार्किंग’ घोषित केले आहे. याशिवाय २८ ते ३१ डिसेंबर पर्यंत खासगी प्रवाशी बस वगळता इतर अवजड वाहनांना किनारी परिसरात विविध ठिकाणी ‘नो एट्री’सह एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.
किनारी भागात किंवा इतर ठिकाणी पर्यटकांना किंवा स्थानिकाना नाहक त्रास करत असल्याचे समोर आल्यास तुरंत कारवाई करण्यात येणार आहे. पर्यटन स्थळे तसेच किनारी भागात पर्यटकांना विविध आमिषे दाखवून लुटण्याचे प्रकार चालू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे पोलीस टाऊट्सवर कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. तसेच सराईत गुन्हेगार आणि भाडेकरूची तपासणी मोहिम हाती घेतली आहे. याशिवाय नवीन वर्ष साजऱ्या करण्यासाठी राज्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांनी कायद्याचे भान ठेवून मौजमजा करावी. कायदा व सुव्यवस्था बिगडण्याचे प्रकार आढळल्यास सबंधितावर कडक कारवाई केली जाईल.
-अक्षत कौशल, पोलीस अधीक्षक - उत्तर गोवा