सुरेश भट, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी यांचा जेव्हा त्रिवेणी संगम होतो, तेव्हा निर्माण होणारी कलाकृती ही अजरामर ठरते हे त्रिकालबाधित सत्य आहे.
जेव्हा आपण आनंदात असतो, तेव्हा गाण्याचे संगीत आपल्याला भावते परंतु आपण जेव्हा उदास असतो, तेव्हा गाण्यांतील, शब्दांतील आर्तता आपल्या काळजाचा ठोका चुकवते आणि भूतकाळातील आठवणी झरझर डोळ्यांसमोर तरळून जातात. ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या... तुझेच मी गीत गात आहे...’ हे गाणे ऐकताना आपल्या मनाची स्थिती अशीच काहीशी होऊन जाते आणि खरे प्रेम म्हणजे काय? हे सर्वस्व गमावल्यावर आलेल्या विरहात जाणवते. दाहक वेदनेच्या धाग्यांची वीण जेव्हा उसवली जाते, तेव्हा या वेदना भळभळ वाहू लागतात आणि मग जे शब्द अंत:करणातून स्फुरत जातात, ते काळजाला चरे पाडतात. या दाहक वेदना जरी मुक्या असल्या, तरी शब्दरूपाने त्या बोलक्या होतात. अशा वेळी व्यक्त झालेल्या या शब्दांत वेदनेची दाहकता तितकीच तीव्र असते.
गझलसम्राट सुरेश भट यांच्या लेखणीतून लिहिल्या गेलेल्या या गीतातील प्रत्येक शब्द हा भावनांनी ओतप्रोत भरलेला आणि भावनांचा कल्लोळ माजवणारा आहे.
‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांद रात आहे’
प्रेमाच्या विरहात गतस्मृतीत हरवून गेलेली गीतातील नायिका विरहाच्या आगीत एकटीच होरपळत असताना तिच्या मुखातून आलेल्या या शब्दांना सुरेश भटांनी भावनांचे सुरेख कोंदण दिले आहे. त्यामुळेच तर या भावना गीतात बोलक्या झालेल्या आपणास दिसतात, या गाण्यातील नायिकेचे जीवन हे आपल्या प्रेमाच्या विरहाने अगदी सुने सुने आणि रिते झालेले आहे. विरहाच्या वेदनेने व्याकुळ होतानाही तिचे मन मात्र अजून भूतकाळात असल्याने ती आपल्या प्रेमासोबत असलेल्या गोड आठवणींच्या स्मृती जागवताना दिसते.
‘कळे न मी पाहते कुणाला, कळे न हा चेहरा कुणाचा?
पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे!’
आपल्या प्रेमासोबत घालवलेले प्रेमाचे क्षण पुन्हा पुन्हा आठवताना आपल्या प्रियकराचा चेहरा व साठवलेल्या गोड आठवणी तिच्या मनात पिंगा घालतात. तिला अस्वस्थ करून सोडतात. पुन्हा पुन्हा ते गोड क्षण आठवून आपल्या प्रेमाचा चेहरा परत परत पाहताना तिला आपला प्रियकर जळी, स्थळी, काष्ठी आपल्याच सोबतच आहे असा भास झाला नाही तर त्यात नवल ते काय? आणि म्हणूनच या संभ्रमावस्थेत ती जेव्हा आरशात पाहते, तेव्हा तिला आपला प्रियकर आणि आपल्या प्रियकराचे हसू आरशात प्रतिबिंबीत होताना दिसते.
हे विरहगीत जितक्या उत्कटतेने लिहिले गेले आहे, तितक्याच उत्कटतेने लतादिदींनी आपल्या गोड आणि भावविभोर आर्त स्वरांत गायिले आहे. गाण्यातील सुरुवातीचा आलाप तर मनाला पीळ घालतो. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताला तर तोडच नाही. सुरेश भट, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लतादीदी यांचा जेव्हा त्रिवेणी संगम होतो, तेव्हा निर्माण होणारी कलाकृती ही अजरामर ठरते हे त्रिकालबाधित सत्य आहे. हे गाणे ‘उंबरठा’ या चित्रपटात प्रख्यात अभिनेत्री स्मिता पाटील यांनी समर्थपणे साकारताना या गाण्याला पूर्णपणे न्याय दिला आहे. जेव्हा सर्वच काही उत्तम असते, तेव्हा मग अशा कलाकृती एकदम हृदयापर्यंत पोहोचतात आणि हृदयात खोलवर झालेल्या जखमांना पुन्हा ताज्या करतात. हेच या गाण्याचे श्रेय आहे. विरहाचे दु:ख हे किती अस्वस्थ करून सोडणारे आहे ते सहन करणार्यालाच समजू शकते. भेटीनंतर आलेला विरह सहन करताना कोलमडून गेल्यावर त्या विरहाच्या ज्वालामुखीत होरपळताना आपल्या वाट्याला आलेले जीवन असहाय्यपणे जगताना या गीतातील नायिकेच्या मनातील उदासिनता सुरेश भट आपल्या खास शैलीत मांडताना पुढे म्हणतात...
‘सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सुर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे!’
मनातील व्यथा, वेदना या कशा शब्दांत मांडाव्यात तर त्या सुरेश भटांनीच! आपल्या सख्यालाही आपलीही आठवण तितकीच येत आहे हे माहीत असल्याने आठवणींना सुरांची उपमा देऊन ते लिहितात की, तुला तुझ्या घरी माझे सूर तुला भेटतील...याचाच अर्थ असा की, जे क्षण आपण एकमेकांच्या सोबतीत घालवले होते, त्या क्षणांची आठवणही तुला येतच राहील. जरी तुझ्याजवळ मी नसेन, तरी या आठवणीतील सुरांच्या सानिध्यात मी तुझ्याजवळच आहे, हे सुरेश भट यांना या शब्दांतून प्रतीत करावयाचे आहे.
पारिजातकाचे फूल जसे सुगंधी आहे, तशी या फुलांची आख्यायिकाही आहे. आपली पत्नी सत्यभामेच्या हट्टाखातीर श्रीकृष्णाने स्वर्गातून पारिजतकाचे झाड आणून तिच्या अंगणात लावले. रुक्मिणीला हे झाड न देता आपल्याला श्रीकृष्णाने हे झाड दिले याचा अहंकार सत्यभामेला झाला होता. परंतु जेव्हा या झाडाला बहर आला, तेव्हा या पारिजतकांच्या सर्व फुलांचा सडा बाजूला असणार्या रुक्मिणीच्या अंगणात पडला. पारिजातकाची फुले जरी अबोल असली, तरी त्यांना खरे प्रेम काय आहे हे समजले असावे! या कथेचा संदर्भ आपल्याला या गीतामध्ये सापडतो. म्हणूनच सुरेश भट लिहितात की, उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे! मोजक्या शब्दांत गहन अर्थ काय? तो यातून समजतो.
आपल्या जीवनात आलेला एकाकीपणा, विरह सहन करताना तगमग झालेला जीव सांभाळताना किती दु:खदायक आहे. पण याची वाच्यता कोणाजवळ करणार? प्रेमासोबतचे क्षण हे आयुष्यभराची शिदोरी म्हणून सांभाळून ठेवते. ‘आर्जव’ या एका शब्दातच इतका अर्थ आहे, की या गाण्यात तो अगदी चपखलपणे बसला आहे. या शब्दात गाण्याची उंची समजून जाते. ज्याच्या प्रेमासाठी आपण विरहात व्याकुळ झालो आहोत, विरहाच्या वेदनेत तळमळत आहोत, त्याची ही स्थिती आपल्यासारखीच असेल का? आपल्याला ज्याचा विरह इतक्या तीव्रतेने जाणवत आहे, त्यालाही आपला विरह तितक्याच तीव्रतेने जाणवत असेल का? अशा अनेक प्रश्नांचे काहूर तिच्या मनात उमटतात. तिच्या मनातील हे भाव व्यक्त करताना सुरेश भट आपल्या गीतातील अंतिम ओळीत लिहितात,
‘उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे?’
प्रेमातील विरहाच्या वेदनांचा उत्सव म्हणजे काय? हा विरहाचा उत्सव जिला अबोलपणे साजरा करायचा आहे, तिच्या मनातील व्यथा सुरेश भट यांनी या गाण्यात इतक्या प्रभावीपणे मांडली आहे, की अशी विरहाची गाणी लिहावी, तर सुरेश भटांनीच! असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. उंबरठा चित्रपटातील हे गीत ज्यांनी आपल्या कलेने अजरामर केले, ते सुरेश भट, पंडित हृदयनाथ मंगेशकर, लतादीदी यांना, तसेच हे गीत चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या ताकदीवर साकारले, त्या स्मिता पाटील या अभिनेत्रीला मानाचा मुजरा!