पेड इन्फ्लुएन्सरकडून गोव्याची हेतुपुरस्सर बदनामी

‘अतिथी देवो भव’ प्रत्यक्षात आणायचे असेल तर त्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यावा लागेल. पर्यटन व्यवसायात घुसलेल्या अपप्रवृत्तींना आळा घालावा लागेल. हे आताच रोखले नाही तर गोव्याची बदनामी सुरूच राहील आणि एक दिवस गोव्याचे पर्यटन क्षेत्रही रसातळाला जाईल.

Story: उतारा |
05th January, 12:10 am
पेड इन्फ्लुएन्सरकडून गोव्याची  हेतुपुरस्सर बदनामी

'गोव्याला जाऊ नका' असे ओरडून ओरडून सांगणारे पेड इन्फ्लुएन्सर युट्युब, इन्स्टा, फेसबुकवर, एक्सवर सध्या जीव ओतून गोव्याची बदनामी करत सुटले आहेत. ज्यांनी ही मोहीम चालवली आहे त्यांना अद्याप त्याचा फायदा झालेला नसेल. चुकीची माहिती आणि पर्यटक कसे कमी झाले ते रेटून रेटून सांगताना काहींची दमछाक होत आहे. बऱ्याच दिवसांपासून ट्विटर, इन्स्टा, फेसबुक, युट्युबवर काही लोक पेड प्रमोशन करावे तसे गोव्याबद्दल चुकीचेच आकडे सांगून उघड उघड खोटे बोलत आहेत. एका रामानूज मुखर्जी नावाच्या ट्विटर बहाद्दराने तर गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचे आकडे टाकून पर्यटक कमी झाले अशी आवई उठवायचा विडा उचलला आहे. अशा बहाद्दरांच्या म्हणण्याला खतपाणी घालतात आपले काही उद्धट वागणारे शॅक मालक, अव्वाच्या सव्वा भाडे आकारणारे टॅक्सीवाले आणि गोव्यात पर्यटकांना ‘घाटी’ म्हणून हिणवणारे अती सुधारलेले गोंयकार. पर्यटन व्यवसाय हा गोव्याचा कणा आहे. पर्यटनाच्या वाढीसाठी प्रयत्न करायचे सोडून काही व्यावसायिकच पर्यटन नष्ट करण्यासाठी वावरत आहेत की काय असा प्रश्न पडतो जेव्हा पर्यटकांवर जीवघेणे हल्ले होतात. पर्यटकांची लूट होत असेल तर तेच पर्यटक गोव्यातून गेल्यानंतर तुमचे बारा वाजवतीलच हेही लक्षात ठेवायला हवे. पब, रेस्टॉरेंट, शॅकवर गेल्यानंतर पर्यटकांना त्यांच्या चेहऱ्यांवरून, कपड्यांवरून कमी लेखणारे लोक त्यांच्याशी क्षुल्लक कारणांवरून भांडण करतात, त्यांना मारहाण करतात, प्रसंगी खूनही करतात असा संदेश जर जात असेल तर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला वाचवणे अशक्य होणार आहे. किनाऱ्यांवर भिकारी, फिरते विक्रेते पिच्छा सोडत नाहीत. स्पा, मसाज, एस्कॉर्टच्या नावाने लूट होते. गोव्याची ही प्रतिमा बदलण्यासाठी सरकारला प्रसंगी कठोर कायदे करावे लागतील. ‘अतिथी देवो भव’ प्रत्यक्षात आणायचे असेल तर त्यासाठी सरकारनेच पुढाकार घ्यावा लागेल. पर्यटन व्यवसायात घुसलेल्या अपप्रवृत्तींना आळा घालावा लागेल. हे आताच रोखले नाही तर गोव्याची बदनामी सुरूच राहील आणि एक दिवस गोव्याचे पर्यटन क्षेत्रही रसातळाला जाईल. २०१२ मध्ये जशा खाणी बंद पडल्यानंतर गेली दहा बारा वर्षे खाणव्याप्त भागातील लोक, व्यावसायिक परिस्थितीशी संघर्ष करत आहेत ती स्थिती पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर येऊ नये यासाठी सावध होण्याची वेळ आली आहे.

काही पेड इन्फ्लुएन्सर कोविड पूर्वीच्या वर्षांतील आकडे आणि कोविडच्या काळापासून ते आतापर्यंतचे आकडे यांची तुलना करून गोव्यात येणारे पर्यटक कसे कमी होत आहेत त्याचे दाखले देत गोव्याची बदनामी करत आहेत. पर्यटन व्यवसायात असलेल्या मोठ्या कंपन्या ज्यांना भारतातील पर्यटक इतर देशांमध्ये न्यायचे असतील किंवा गोव्यातून इतर राज्यांमध्ये/ देशांमध्ये पर्यटक न्यायचे असतील ते अशा लोकांना हाताशी धरून गोव्याची बदनामी करत राहतील. गेल्या काही महिन्यांपासून गोव्याची हेतुपुरस्सर बदनामी सुरू आहे. त्यावरून ही एक मोहीम सुरू आहे हे लक्षात येईल. कारण त्याच पद्धतीची बदनामी वेगवेगळ्या सोशल मिडियावरील इन्फ्लुएन्सर करत आहेत. सलगपणे गोव्यातील पर्यटकांचे आकडे कमी दाखवून आणि सध्याच्या पर्यटकांच्या संख्येची तुलना २०१९ च्या आकड्यांशी करून गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक कमी होत आहेत असा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात ही खोटी माहिती पसरवणारे ज्या राज्यांशी किंवा देशांशी संबंधित असतील त्यांनी त्या राज्यांतील किंवा देशातील सध्याचे आकडे २०१९ कडे जोडून लोकांना सांगावे की तिथे काय परिस्थिती आहे.

भारताच्या पर्यटन मंत्रालयाकडे आणि इमिग्रेशन ब्युरोकडील आकडे पाहिले तर देशातील पर्यटनाची स्थिती पूर्व कोविड आणि कोविडनंतर काय होती किंवा आहे ते स्पष्ट होते. ते खरे आकडे पाहिल्यानंतर अशा सुपारी बहाद्दरांची दुकाने कोण चालवतो आणि ते कोणासाठी पेड इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत आहेत हेही लक्षात येईल. फक्त गोवा किंवा भारतात नव्हे तर जगभरातील पर्यटनाची स्थिती कोविडनंतर सुधारत आहे. कोविडच्या पूर्वी सर्व पर्यटन राज्यांमध्ये आणि देशांमध्ये जे पर्यटक यायचे त्यांची संख्या २०२०, २०२१ पर्यंत प्रचंड कमी झाली होती. २०२२, २०२३ आणि २०२४ या तीन वर्षांमध्ये सर्वच ठिकाणी विदेशी आणि देशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. कोविडच्या काळात जगभरात पर्यटन क्षेत्राला उतरती कळाच लागली होती. २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांमध्ये जगभरात पर्यटकांची संख्या प्रत्येकी १३३ कोटी, १४१ कोटी आणि १४६ कोटी होती. २०२० मध्ये ती ४० कोटी, २०२१ मध्ये ४५ कोटी तर २०२२ मध्ये जेव्हा स्थिती पूर्वपदावर येऊ लागली त्यावेळी १०० कोटीच्या आसपास संख्या पुन्हा गेली. हे जगाचे चित्र आहे. हे आकडे कोणी लपवू शकत नाही. गोव्याचीच बदनामी करायची असेल तर मागचे पुढे लपवून बदनामी होईल एवढेच काढून ‘कट पेस्ट’ करायचे असेल तर ती निव्वळ बनवेगिरी आहे. हीच बवनेगिरी सध्या काही इन्फ्लुएन्सरनी चालवली आहे. त्यांच्याकडून हे काम करून घेणाऱ्यांनीही यासाठी प्रचंड पैसे मोजलेले असतील यात शंका नाही. मग त्यात कंपन्या असतील किंवा काही वैयक्तिक लोकही असू शकतात.

भारतातील स्थिती पाहिली तर विदेशी पर्यटकांची संख्या २०१७ मध्ये १०.०४ दशलक्ष म्हणजेच १ कोटीपेक्षा जास्त, २०१८ मध्ये १०.५६ दशलक्ष तर २०१९ मध्ये विदेशी पर्यटकांची संख्या १०.९३ दशलक्ष झाली होती. ही संख्या २०२० मध्ये २.७४ दशलक्ष, २०२१ मध्ये १.५२ दशलक्ष झाली. ही दोन वर्षे कोविडचा फटका बसला हे स्पष्ट आहे. २०२२ मध्ये कोविडची स्थिती सुधारल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून ६.९७ दशलक्ष झाली. ती संख्या २०२३ मध्ये ९.५२ दशलक्ष झाली. ही सर्व माहिती पर्यटन मंत्रालय, इमिग्रेशन ब्युरोकडे उपलब्ध आहे. त्यामुळे गोव्याचे पर्यटक कमी झाले म्हणून ओरडत फिरणाऱ्या पेड इन्फ्लुएन्सरनी जगातले, देशातले आकडे जाहीर करावेत.

गोवा इतर मोठ्या राज्यांच्या स्पर्धेत २०१९ पूर्वीही नव्हता आणि आताही नाही. गोव्याची ओळख वेगळी आहे. गोव्याची 'कॅरिंग कॅपॅसिटी' वेगळी आहे. गोव्याचे क्षेत्रफळ कमी आहे. गोवा हे १५ लाख लोकसंख्येचे आणि ३७०२ चौरस किमी२ चे एक लहान राज्य आहे. त्यामुळे मोठमोठ्या राज्यांकडे किंवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशांकडे तुलना करण्यात काही अर्थ नाही. विदेशी पर्यटकांसाठी तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ ही राज्ये आघाडीवर होती. गोव्याने आपले एक विशेष स्थान तयार केलेले आहे. इथली जीवनशैली वेगळी असल्यामुळे देशी आणि विदेशी पर्यटक गोव्याकडे आकर्षित होतात. गोवा जेवढे आहे त्यात समाधानी आहे. त्यासाठी गोव्यावर इतर राज्यांची किंवा देशांची बदनामी करण्याची वेळ कधी आली नाही.

भारतातील देशी पर्यटकांची संख्या पाहिली तर २०१८ मध्ये १८५ कोटी होती. २०१९ मध्ये ती २३२ कोटी झाली. तर २०२० मध्ये ६१ कोटी, २०२१ मध्ये ६७ कोटी आणि २०२२ मध्ये ती पुन्हा २०१८ मधील संख्येच्या जवळपास येत १७३ कोटी झाली. पर्यटन मंत्रालयाच्या आकड्यांप्रमाणे ही संख्या २०२३ मध्ये २५० कोटी झाली. देशी पर्यटक कुठल्या राज्यांत फिरतात, किती वेळा फिरतात त्यानुसार त्यांची गणना होते. ही स्थिती पाहिली तर देशी पर्यटकांची संख्या पूर्वपदावर येत आहे. विदेशी पर्यटकांची संख्या पूर्वपदावर येण्यास अजून वेळ लागेल. रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन अशा देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष हेही पर्यटनावर परिणाम करणारे आहे.

आता गोव्याची स्थिती पाहू. देशी पर्यटक २०१८ मध्ये ७० लाख होते तर विदेशी पर्यटकांची संख्या त्यावेळी ९.३३ लाख होती. २०१९ मध्ये देशी पर्यटकांची संख्या ७१ लाख झाली तर विदेशी पर्यटकांची संख्या ९.३७ लाख झाली. कोविडच्या महामारीमुळे २०२० मध्ये गोव्यात देशी पर्यटकांची संख्या कमी होऊन ती ३२.५८ लाख झाली. तर विदेशी पर्यटकांची संख्या  ३ लाख झाली. २०२१ मध्ये देशी पर्यटकांची संख्या ३३ लाख झाली तर विदेशी पर्यटकांची संख्या २ लाखांपर्यंत खाली आली. २०२२ मध्ये कोविड ओसरल्यानंतर गोव्यात देशी पर्यटकांची संख्या पुन्हा ७० लाखांवर आली. विदेशी पर्यटकांची संख्या दहा लाखांच्या पार गेली. २०२३ मध्ये देशी पर्यटक ८० लाखांपेक्षा जास्त झाले तर विदेशी पर्यटक साडे दहा लाखांपेक्षा जास्त झाले. हे सगळे आकडे पाहिले तर गोव्यात येणारे पर्यटक कोविडच्या पूर्वीपेक्षा आता जास्तपटीने वाढत आहेत. कोविडनंतर पुन्हा पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी काही वर्षे लागतील असे दिसत असतानाच गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे गोवा लवकरच पर्यटकांच्या नवीन संख्येचा विक्रम नोंदवणार आहे. हे सगळे आकडे केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या अहवालात आहेत. त्यामुळे गोव्यात पर्यटक नाहीत, गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होत आहे किंवा गोव्यात पर्यटक येऊ नयेत यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा कुठलाच परिणाम गोव्याच्या पर्यटनावर झालेला दिसत नाही. सरकारने गोव्याची बदनामी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळताना इथल्या मुजोर बनलेल्या काही पर्यटक व्यावसायिकांना आणि सरकारी यंत्रणेला मात्र सुधरवण्याची गरज आहे.


पांडुरंग गांवकर

९७६३१०६३००
(लेखक दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.)