सिराज-कृष्णाने पटकावल्या ३-३ विकेट. भारताकडे अवघ्या ४ धावांची आघाडी. बुमराह वैद्यकीय चाचण्यांसाठी मैदानाबाहेर. कर्णधारपद कोहलीकडे
सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरू आहे. कालच्या १ गडी बाद ९ धावसंख्येवरुन पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ वर आटोपला. दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून बाद होणारा शेवटचा फलंदाज स्कॉट बोलंड होता. मोहम्मद सिराजने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या. अशा प्रकारे भारताने ४ धावांची आघाडी घेतली आहे.
भारतासाठी सद्यघडीस चिंतेची बाब म्हणजे कर्णधार जसप्रीत बुमराह शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळाच्या दुसऱ्या सत्रात वैद्यकीय चाचणीसाठी गेला असून विराट कोहलीकडे त्याने सूत्रे सोपवली आहेत. जेवणानंतर केवळ एक षटक टाकल्यानंतर तो मैदानातून बाहेर पडला. त्यानंतर संघाचे डॉक्टर आणि बीसीसीआयचे व्यवस्थापक अंशुमन उपाध्याय यांच्यासोबत तो कारमधून निघून गेला.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने आज सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ९ धावांवर १ गडी या धावसंख्येवरून केली. आज जसप्रीत बुमराहने १५ धावांच्या स्कोअरवर मार्नस लॅबुशेनला (२) बाद केले. सॅम कॉन्स्टासला (२३) मोहम्मद सिराजने बाद करण्याआधी धावफलकात आणखी २० धावांची भर पडली होती. त्याच षटकात सिराजने ट्रॅव्हिस हेडलाही बाद केले. हेडला केवळ ४ धावा करता आल्या. ३९ धावांवर ४ विकेट गमावल्याने ऑस्ट्रेलिया संकटात सापडला होता. पण, स्टीव्ह स्मिथ आणि नवोदित ब्यू वेबस्टर यांनी ५व्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला सामन्यात परत आणले.
कांगारू ९६ धावांवर पोहोचले तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने स्टीव्ह स्मिथला बाद करून ही धोकादायक जोडी फोडली. यानंतर वेबस्टर आणि ॲलेक्स कॅरी यांच्यात ४० हून अधिक धावांची भागीदारी झाली. १३७ धावांच्या स्कोअरवर कॅरीला कृष्णाने क्लीन बोल्ड केले. यानंतर नितीश रेड्डीने मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांना बाद करून भारताला सामन्यात परत आणले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव १८१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने ३-३ बळी घेतले. बुमराहने २ विकेट्स पटकावल्या.