विजय हजारे चषकात गोव्याचा गुजरातकडून एकतर्फी पराभव

सिद्धार्थचा एकाकी संघर्ष; अक्षर पटेल ठरला सामनावीर

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd January, 09:08 pm
विजय हजारे चषकात गोव्याचा गुजरातकडून एकतर्फी पराभव

पणजी :  विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा गुजरातने एकतर्फी पराभव केला. जयपूर येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात गुजरातने ११८ धावांचे माफक लक्ष्य केवळ १६.५ षटकांत गाठले.

या सामन्यात गोव्याचा संघ गुजरातला टक्कर देणार अशी सर्वांचीच अपेक्षा होती मात्र गोव्याच्या फलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली. सलग तिसऱ्या सामन्यात गोव्याच्या फलंदाजांनी विरोधी संघाच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. गुजरातविरुद्ध केवळ के. सिद्धार्थ (४३) वगळता एकही फलंदाज प्रभाव टाकू शकला नाही. 

११८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उर्विल पटेल (६१) आणि उमंग कुमार (२४) यांच्या ३४ चेंडूत केलेल्या शानदार फलंदाजीमुळे गुजरातने १६.४ षटकांत चार गडी गमावून ११८ धावा करत सहा विकेट्स राखून सामना जिंकला. आर्या देसाई १६ आणि सौरव चौहान १ धाव करून बाद झाले. हेमांग पटेल ९ आणि विशाल जैस्वाल ५ धावा करून नाबाद राहिले. गोव्यासाठी फेलिक्स आलेमावने दोन फलंदाजांना बाद केले, तर शुभम तारी आणि अमुल्य पांड्रेकरने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीला आलेल्या गोव्याची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या पाच धावांवर गोव्याची विकेट गेली. इशान गाडेकर एक धाव काढून बाद झाला. यानंतर स्नेहल कवठणकर आणि कृष्णमूर्ती सिद्धार्थने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. १३व्या षटकात अर्जन नागवासवालाने स्नेहल कवठणकरला (२९) बाद करून ही भागीदारी तोडली. यानंतर गुजरातच्या गोलंदाजीसमोर गोव्याच्या विकेट पडत राहिल्या. गोव्यासाठी कृष्णमूर्ती सिद्धार्थने सर्वाधिक (४३) धावांची खेळी खेळली. कर्णधार दर्शन मिसाळ १० धावा करून बाद झाला. गोव्याचा संपूर्ण संघ ३५.४ षटकांत ११७ धावांत गारद झाला.

गोव्याची फलंदाजांची निराशाजनक कामगिरी

अखेरच्या तीन सामन्यात गोव्याच्या फलंदाजांनी संघाची साफ निराशा केली आहे. आसामविरुद्ध गोव्याला सामना जिंकण्यात यश आले तरी १८२ धावांवर गोव्याचा डाव आटोपला होता. उत्तराखंडविरुद्ध तर संपूर्ण गोवा केवळ ९२ धावांत संपला होता. आता गुजरात​विरुद्ध सलग तिसऱ्यांदा गोव्याच्या फलंदाजांनी साफ निराशा केली आहे.