रोहित शर्माला विश्रांती; बुमराहकडे नेतृत्वाची धुरा

शुभमन गिलचे पुनरागमन : आकाशदीप दुखापतीमुळे बाहेर

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd January, 12:10 am
रोहित शर्माला विश्रांती; बुमराहकडे नेतृत्वाची धुरा

सिडनी : आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळताना दिसणार नाही. रोहित शर्माने स्वत:च हा निर्णय घेतला आहे. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करणार आहे. यासह शुभमन गिल पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनचा भाग होईल. तर पाचव्या कसोटीत आकाशदीपच्या जागी प्रसिध कृष्णाला संधी मिळू शकते.
रोहितने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना त्याची प्लेईंग इलेव्हनमधील निवड रद्द करण्यास सांगितले आणि या निर्णयावर या दोघांनी सहमती दर्शवली.
रोहितच्या या निर्णयाचा अर्थ असाही होऊ शकतो की मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी रोहितची भारतासाठी शेवटची ठरू शकते. कारण यानंतर इंग्लंडच्या दौऱ्यापासून सुरू होणाऱ्या पुढील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप चक्रामध्ये योजनांमध्ये रोहित शर्मा संघाचा भाग नसू शकतो. सध्याच्या चक्रात भारत डब्ल्यूटीसी फायनलसाठी पात्र ठरण्याची शक्यता फारच कमी आहे.
रोहित शर्माच्या जागी आता संघात शुभमन गिलला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार आहे. मेलबर्न कसोटीत शुबमन गिलला वगळण्यात आल्यानंतर पत्रकार परिषदेत सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना त्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी शुभमनला वगळले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. संघाचे संतुलन योग्य असावे यादृष्टीने वॉशिंग्टनला संघात स्थान देण्याचा निर्णय झाला, यामुळे गिलला अंतिम अकरात जागा मिळू शकली नाही असे ते म्हणाले होते. रोहित शर्माने सिडनी कसोटीत विश्रांतीचा निर्णय घेतल्याने गिलचा संघात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान पाठीच्या दुखण्यामुळे वेगवान गोलंदाज आकाश दीप सिडनी कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी हर्षित राणाला संधी मिळणार का प्रसिध कृष्णाला याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या. हर्षित राणा पर्थ कसोटीत खेळला होता. मात्र प्रदीर्घ स्पेल टाकल्यानंतर त्याची दमछाक उडाली होती. त्यामुळे सिडनी कसोटीत प्रसिध कृष्णाला अंतिम अकरात खेळवण्यात येणार आहे. कृष्णाने वर्षभरापूर्वी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. २ कसोटीत त्याने २ विकेट्स पटकावल्या आहेत.
जडेजा, सुंदर आणि नितीश हे अष्टपैलू खेळाडू
भारताने गेल्या सामन्यात तीन अष्टपैलू खेळाडूंना खेळवले होते. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन फिरकी अष्टपैलू होते. नितीश रेड्डी वेगवान अष्टपैलू म्हणून खेळले. सिडनीच्या खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता या सामन्यातही संघ त्याच संयोजनाने उतरू शकतो. येथे वेगापेक्षा फिरकीला अधिक मदत मिळते. अशा स्थितीत जडेजा आणि सुंदर या दोन फिरकी गोलंदाजांना खेळवणे शक्य आहे.
अखेरच्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने संघात मोठा बदल केला आहे. त्यांनी फॉर्मात नसलेल्या अष्टपैलू मिचेल मार्शला संघातून वगळले आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने संघाची घोषणा करताना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कबाबतही अपडेटही दिले आहेत. फॉर्मात नसलेल्या मिचेल मार्शच्या जागी ऑस्ट्रेलियाने ३१ वर्षीय अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टरला पदार्पण करण्याची संधी दिली आहे. त्याने ९३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३७.३९ च्या सरासरीने १४८ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये दोनदा पाच विकेट घेण्याचा पराक्रम देखील केलेला आहे. या तस्मानियाच्या या अष्टपैलू खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३७.८३ च्या सरासरीने ५२९७ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये १२ शतकं आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११ : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज, प्रसीद्ध कृष्णाबॉक्स
ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग ११ : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
आजचा सामना
भारत वि. ऑस्ट्रेलिया
स्थळ : सिडनी क्रिकेट ग्राऊंड, सिडनी
वेळ : पहाटे ५ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिझ्ने प्लस हॉटस्टार