गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीचे आयोजन : ३७ राज्यांतील २२० धावपटू होणार सहभागी
पत्रकार परिषदेत बोलताना गोवा राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या संचालक डॉ. ललिता हुमरसकर. बाजूला उमाकांत सावंत.
पणजी : गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीतर्फे १८ जानेवारीला पणजी येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मॅरेथॉनमध्ये ३७ राज्यातील सुमारे २२० धावपटू सहभागी होणार आहेत, अशी माहिती गोवा राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या संचालक डॉ. ललिता हुमरसकर यांनी दिली.मॅरेथॉनची माहिती देण्यासाठी गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीने आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी डॉ.ललिता हुमरसकर, उमाकांत सावंत उपस्थित होते.
गेल्या वर्षीप्रमाणे, गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी गोव्यात रेड रनची दुसरी आवृत्ती आयोजित करणार आहे. उत्तम आरोग्य आणि एचआयव्ही-एड्स संबंधी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे, असे हुमरसकर यांनी सांगितले. ही स्पर्धा देशभरात घेतली जाते आणि स्पर्धेची अंतिम फेरी गोव्यात होते. इतर राज्यांतील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विजेते गोव्यातील अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार. त्यांच्यासाठी १० किमीची मॅरेथॉन होणार आहे. ही मॅरेथॉन मिरामार सर्कलपासून सुरू होऊन दोनापावला सर्कल ते गोवा विद्यापीठ ते मिरामार सर्कलपर्यंत होणार आहे. तर इतरांना २ किमी लांबीच्या शर्यतीत सहभागी होता येईल, असे सावंत म्हणाले.गोव्याला या स्पर्धेचे कायमस्वरूपी यजमानपद मिळाले आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना ५० हजार रुपये तर द्वितीय क्रमांकास ३५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. यामध्ये तृतीय पंथीय गटाचाही समावेश करण्यात आला आहे आणि त्यांना इतरांप्रमाणेच पुरस्कृत केले जाईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला पदक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे सावंत म्हणाले.
दिव्यांगांसाठी खास स्पर्धा
दिव्यांगांसाठी खास पद्धतीने या स्पर्धेत समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.स्पर्धा सकाळी ६.१५ वाजता सुरू होईल. स्पर्धेसाठी इच्छुकांनी गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी. आम्ही स्पर्धेत १ हजारहून अधिक लोक सहभागी होण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे सावंत म्हणाले.