कॅरेलिसच्या शानदार प्रदर्शनाने मुंबई पुन्हा विजयी मार्गावर

इंडियन सुपर लीग; यजमान ईस्ट बंगाल एफसीचा पराभव

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
06th January, 10:20 pm
कॅरेलिसच्या शानदार प्रदर्शनाने मुंबई पुन्हा विजयी मार्गावर

कोलकाता : रंगतदार साखळी लढतीत यजमान ईस्ट बंगाल एफसीला ३-२ असे असे रोखत गतविजेता मुंबई सिटी एफसी संघ इंडियन सुपर लीगच्या २०२४-२५ हंगामात पुन्हा विजयी मार्गावर परतला. दोन गोल करणारा स्ट्रायकर निकोलाओस कॅरेलिस हा पाहुण्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

पिछाडीवर पडलेल्या ईस्ट बंगाल एफसीने उत्तरार्धात आक्रमणात धार आणली. ४८व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र, त्याचे गोलात रूपांतर करण्यात अपयश आले. ५१व्या मिनिटाला जीक्सन सिंगने मारलेला चेंडू गोलपोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेला. मात्र, यजमानांच्या मदतीला पाहुणे आले. ६६व्या मिनिटाला साहील पनवरने स्वयंगोल करताना आघाडी २-१ अशी कमी केली.


या गोलमुळे ईस्ट बंगाल एफसीचा आत्मविश्वास उंचावला. त्यानंतर ८३व्या मिनिटाला डेव्हिड लाहलानसंगाने पाहुण्यांचा बचाव मोडून काढताना २-२ अशी बरोबरी साधली. हेक्टर युस्टेच्या हेडरवर डाव्या कॉर्नरने त्याने चेंडू अचूक गोलपोस्टमध्ये टाकला. सामना संपायला ७ मिनिटे शिल्लक असताना २-२ अशी बरोबरी झाल्याने उत्कंठा वाढली. मात्र, पाहुण्यांनी दडपण न घेता सर्वोत्तम खेळ कायम राखला. निकोलाओस कॅरेलिसने नॅथन रॉड्रिग्जच्या पासवर गोल करताना मुंबई सिटी एफसीला ३-२ असे आघाडीवर नेले. हाच गोल महत्त्वपूर्ण ठरला.  

तत्पूर्वी, मुंबई सिटी एफसीने २-० अशी आघाडी घेत पहिल्या सत्रावर वर्चस्व राखले. दोन्ही गोल चार मिनिटांच्या फरकाने झाले. ३९व्या मिनिटाला लालियानझुआला छांगटेने ब्रँडन फर्नांडेसच्या पासवर पेनल्टी एरियाच्या मध्यावरून त्याने यजमानांची बचावफळी भेदताना डाव्या कॉर्नरने चेंडूला अचूक गोलजाळ्यात ढकलले. त्यानंतर ४३व्या मिनिटाला निकोलाओस कॅरेलिसने गतविजेत्यांची आघाडी वाढवली. चेंडूवर ताबा घेत उजव्या कॉर्नरने त्याने अप्रतिम मैदानी गोल केला.