सरसांगण सुपर सीरिज क्रिकेट : एमएलटी क्रिकेट क्लब, सिनक्यू संघांचे पराभव
पणजी : राजदीप बिल्डर्स सरसांगण सुपर सीरिज क्रिकेट (Cricket) स्पर्धेत कॉमनवेल्थ फाउंटनहेड्स व डीएनएस/ व्हीएमजीच्या रुकीज संघांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला. १२व्या दिवसातील हे सामने आर्लेम क्रिकेट मैदानावर आयोजित करण्यात आले होते.
दिवसातील पहिल्या सामन्यात कॉमनवेल्थने एमएलटी क्रिकेट क्लबचा ६२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कॉमनवेल्थच्या सलामीवीरांनी ४.४ षटकांत ४९ धावांची भागीदारी केली. कर्णधार अमोद बोरकरने ३८ व गौरीश शेणवी लोटलीकरने १७ धावा केल्या. आदित्य प्रभुगावकर (१६) व अमेय राजाध्यक्ष (३८) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली. रघुवीर घार्सेने १२ तर साईश हेगडेने नाबाद २५ धावांचे योगदान देत आपल्या संघाला ८ बाद १७८ धावांपर्यंत पोहोचवले. मनीष काकोडेने २, दत्तराज पै फोंडेकरने २ व सिद्देश बोडके आणि अनिश काकोडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
मिळालेले लक्ष्य एमएलटीसाठी सोपे नव्हते. त्यांचा संपूर्ण संघ १४.३ षटकांत ११६ धावांत आटोपला. कॉमनवेल्थतर्फे गोलंदाजीत आदित्य प्रभुगावकरने १३ धावांत सर्वाधिक ४ गडी बाद केले. याशिवाय साईश हेगडे व यश प्रभुगावकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले तर प्रताप प्रभुगावकर व अमोद बोरकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आदित्य प्रभुगावकरला सामनावीर, अमेय राजाध्यक्षला उत्कृष्ट फलंदाज व साईश हेगडेला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडण्यात आले.
दिवसातील दुसऱ्या सामन्यात रुकीजने सिनक्यू रेंर्सचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रेंजर्सने कर्णधार साहील अडवलपालच्या ३५ धावांच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या. कौशिक पैनेही यात २८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. वेद महांबरेने १५ धावांत २ गडी बाद केले तर अघन भंडारे, प्रथम कोसंबे, मिहिर गायतोंडे व सुकृत पै यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात रुकीजने मिळालेले लक्ष्य १६.३ षटकांत ३ गडी गमावून गाठले. रुपेश कोसंबेने २६, इशान कामतने ३८ आणि वेद महांबरेने २६ धावा केल्या. याव्यतिरिक्त सकृत पैने १८ व राजाराम कुंडईकरने १३ धावांचे योगदान दिले. वेद महांबरेला सामनावीर, इशान कामतला उत्कृष्ट फलंदाज व अघन भंडारेला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडण्यात आले.
सामन्यांवर संक्षिप्त नजर...
राजदीप बिल्डर्स सरसांगण सुपर सीरिज क्रिकेट स्पर्धेत कॉमनवेल्थ फाउंटनहेड्सने एमएलटी क्रिकेट क्लबचा ६२ धावांनी पराभव केला तर डीएनएस/ व्हीएमजेच्या रुकीजने सिनक्यू रेंजर्सचा ७ गडी व २१ चेंडू शिल्लक ठेवून पराभव केला. हे दोन्ही सामने आर्लेम क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले होते.