आयएसएल; हैदराबाद एफसीने १-१ असे बरोबरीत रोखले
पणजी : घरच्या मैदानावर हैदराबाद एफसीने १-१ असे बरोबरीत रोखल्याने एफसी गोवाची इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या हंगामातील पाच सामन्यांची अपराजित मालिका खंडित झाली. अलॅन पॉलिस्टाने अतिरिक्त वेळेत केलेला गोल पाहुण्यांचा आणखी एक पराभव टाळण्यात मोलाचा ठरला. या लढतीत मध्यंतरानंतर दोन्ही संघाच्या प्रत्येकी एका खेळाडूला रेड कार्ड दाखवण्यात आले.
फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बुधवारी दोन्ही गोल उत्तरार्धात झाले. स्ट्रायकर अर्मांडो सडिकूने ५२व्या मिनिटाला यजमानांना आघाडीवर नेले. एफसी गोवा आघाडी कायम राखण्यासह प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध क्लीन शीटचा नवा विक्रम करणार असे वाटत असतानाच अतिरिक्त वेळेत दुसर्या मिनिटाला (९०+२व्या मिनिटाला) अलॅन पॉलिस्टा हा हैदराबाद एफसीच्या मदतीला धावला. त्याने इसाक वनमाल्सावमाच्या क्रॉसवर चेंडूवर ताबा घेत यजमानांची बचावफळी भेदली.
मध्यंतरानंतर पाहुण्या संघाने चांगल्या चाली रचल्या. गोडार्ड आणि अँड्री अल्बाने यजमानांची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र, एफसी गोवाचा डिफेन्स सरस ठरला. ५० व्या मिनिटाला हैदराबाद ठफसीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, तो वाया गेला. पाहुण्यांच्या आक्रमणाला यजमानांनी तोडीत तोड उत्तर दिले. ५२ व्या मिनिटाला अर्मांडो सडिकूने हैदराबाद एफसीची डेजान ड्रॅझिकच्या हेडेड पासवर उजव्या कॉर्नरने अप्रतिम गोल करताना यजमानांना १-० असे आघाडीवर नेले.
आघाडी घेतलेल्या एफसी गोवाला ५९ व्या मिनिटाला धक्का बसला. आक्षेपार्ह वर्तनामुळे रेफ्रींनी बोर्जा हेरेरा रेड कार्ड दाखवले. त्यामुळे उर्वरित वेळात यजमानांवर १० खेळाडूंसह खेळण्याची वेळ आली. ६३ व्या मिनिटाला एफसी गोवाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, गोलसंख्येत भर घालण्यात त्यांना यश आले नाही. मात्र, यजमानांनी आघाडी टिकवली. दुसरीकडे, दुसर्यांदा पिवळे कार्ड दाखवण्यात आल्याने अलेक्स सजीला ७१ व्या मिनिटाला मैदानाबाहेर जावे लागले. शेवटची २९ मिनिटे दोन्ही संघ प्रत्येकी दहा खेळाडूंसह खेळले. याचा फायदा हैदराबाद एफसीने उठवला. इसाक वनमाल्सावमाच्या क्रॉसवर अलॅन पॉलिस्टाने डाव्या कॉर्नरने सुरेख गोल करताना हैदराबाद एफसीला १-१ अशी बरोबरी गाठून दिली
तत्पूर्वी, पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी राहिली. यजमानांनी आक्रमक सुरुवात करताना चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र, त्याचे गोलात रूपांतर झाले नाही. त्यानंतर पाहुण्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रामलुंगछुंगा आणि जोसेफ सनीने सातव्या आणि नवव्या मिनिटाला अनुक्रमे अँड्री अल्बा आणि अब्दुल रबीहच्या पासवर टार्गेट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न थोडक्यात चुकले. अल्बाने १० व्या मिनिटाला रामलुंगछुंगाच्या पासवर मारलेला चेंडू गोलपोस्टच्या वरून बाहेर गेला.त्यानंतर एफसी गोवा आणि हैदराबाद एफसी यांच्यातील आक्रमण आणि बचावफळीमध्ये वर्चस्वासाठी चुरस पाहायला मिळाली. ३३ आणि ४२व्या मिनिटाला यजमानांना पेनल्टी कॉर्नरद्वारे आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा राहिला.
एफसी गोवा तिसऱ्या स्थानी कायम
बुधवारची बरोबरी ही एफसी गोवाची १४ सामन्यांतील एकूण पाचवी आणि मागील चार सामन्यांतील चौथी बरोबरी आहे. या बरोबरीनंतर गौर्सचे १४ सामन्यांतून २६ गुण झालेत. ताज्या गुणतालिकेत ते तिसर्या स्थानी कायम आहेत. हैदराबाद एफसीची १५ सामन्यांतील एकूण तिसरी आणि मागील तीन सामन्यांतील दुसरी बरोबरी आहे. ९ गुणांसह ते १२व्या स्थानावर कायम आहेत.
निकाल: एफसी गोवा १ (अर्मांडो सडिकू, ५२ व्या मिनिटाला) बरोबरी वि. हैदराबाद एफसी १ (अलॅन पॉलिस्टा, ९०+२ ऱ्या मिनिटाला).