पिकलबॉल चॅम्पियनशिप: सिमरनचे महिला एकेरीत विजेतेपद
पणजी : मडगावमध्ये आयोजित राज्य मानांकन पिकलबॉल स्पर्धेत मडगाव येथील निषाद शेवडे आणि निहाल बोरकर या दोघांनी तिहेरी किताब जिंकून राज्यातील पहिल्या राज्य मानांकन पिकलबॉल स्पर्धेत इतिहास घडवला.
निहालने बीपीएस ओपन पिकलबॉल स्पर्धेत तीन विजेतेपदांसह आपले वर्चस्व सिद्ध केले. ३५+ मिश्र दुहेरी गटात, त्याने रुता बोरकरसोबत जोडी जमवत अर्लीक आणि नताशा डी अताईड यांचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. पहिला सेट १०-१२ ने गमावल्यानंतर, निहाल आणि रुता यांनी उत्तम पुनरागमन करत पुढील दोन सेट ११-७ आणि ११-९ अशा गुणांनी जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ३५+ पुरुष दुहेरी गटात, निहालने अखिल लवांडे यांच्यासोबत जोडी जमवत चिन्मय कांतक आणि अर्लीक अताईड यांच्यावर ११-६, ११-६ असा सहज विजय मिळवला. तसेच, ३५+ पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत निहालने नोएल नोरोन्हा यांचा ११-६, ११-५ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले.
निषाद शेवडे ने स्पर्धेत तीन विजेतेपदांची कमाई केली. खुल्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत त्यांनी क्लियोन बरेटोचा ११-९, ११-३ अशा फरकाने पराभव केला. खुल्या मिश्र दुहेरीत, निषादने स्वेता कंटकसोबत जोडी जमवून अंतिम फेरीत ११-५, १०-१२, ११-२ असा विजय मिळवला. त्याचबरोबर, खुल्या पुरुष दुहेरीत २१ संघ सहभागी झाले होते, त्यात निषाद आणि अर्लीक अताईड यांना ११-८, ११-३ असा विजय मिळवून विजेतेपद मिळवले.
गोव्याची टेनिस स्टार सिमरन बुंदेला हिने तिच्या तीन प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध सर्वाधिक गुण मिळवून महिला एकेरी गट जिंकला. तिने ३३ गुण मिळवले आणि ६ गुण गमावले. त्विशा सरदेसाईचे गुण २६-१३, सोलानियाचे १४-२६ आणि सुमंगलीचे ५-३३ आहेत.
गोवा पिकलबॉल असोसिएशन आणि ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन (एआयपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने बीपीएस क्लबमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्व वयोगटातील आणि लिंगांच्या १२३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. एकूण १० विविध गटांमध्ये सामने खेळवले गेले, ज्यामध्ये सर्व विजेत्यांनी मिळून सुमारे १ लाख रुपयांची रोख बक्षिसे जिंकली.
पुरुषांच्या ५०+ दुहेरी गटात नऊ संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम फेरीत लिंकन फुर्टाडो आणि विली जॅक्स यांची क्लेरेन्स नोरोन्हा आणि नोएल नोरोन्हा यांच्याशी चुरशीची लढत झाली. क्लेरेन्स आणि नोएल यांनी ११-३, ७-११, ११-८ अशा गुणांनी रोमांचक विजय मिळवला. पुरुषांच्या ५०+ एकेरी गटात सात खेळाडूंनी सहभाग घेतला. अंतिम फेरीत नोएल नोरोन्हाने विली जॅक्सचा ११-७, ११-६ असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
ऑड्रे मिनेझिस-मेलानी चौगुले महिला दुहेरीच्या विजेत्या
ऑड्रे मिनेझिस आणि मेलानी चौगुले यांनी इतर दोन संघांविरुद्ध एकूण सर्वाधिक गुण मिळवून खुल्या महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. त्यांनी २२ गुण मिळवले आणि फक्त ३ गमावले. इतर संघांमध्ये रुता बोरकर आणि श्वेता कंटक यांनी १२-११ गुण मिळवले आणि अदिती जोशी आणि मार्व्हलिन डायस यांनी २ -२२ गुण मिळवले.