गांजा, स्मार्ट सिटीच्या कामांच्या प्रश्नांवरून बाबूश भडकले!

स्मार्ट सिटीचा प्रश्न मुख्य सचिवांना विचारण्याचा सल्ला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 hours ago
गांजा, स्मार्ट सिटीच्या कामांच्या प्रश्नांवरून बाबूश भडकले!

पणजी : राजधानी पणजीतील सार्वजनिक ठिकाणी दोनवेळा सापडलेली गांजाची रोपटी आणि स्मार्ट सिटीच्या कामांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवरून मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात पत्रकारांवर भडकले. गांजाची लागवड मी केली का, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांनाच विचारला. तर, स्मार्ट सिटीची कामे कधी पूर्ण होणार हे मुख्य सचिव आणि इमॅजिन पणजीचे व्यवस्थापकीय संचालकांना विचारण्याचा सल्ला त्यांनी दिला.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांनी मंत्री बाबूश यांना भेटून पणजीत गेल्या काही दिवसांत सार्वजनिक ठिकाणी आढळलेल्या गांजाच्या रोपट्यांसंदर्भात प्रश्न केला. त्यावर पणजीत मी गांजा आणून लावला आहे का, तुम्हीच त्याचा शोध घ्या, असे उत्तर त्यांनी दिले. तर, स्मार्ट सिटीअंतर्गत पणजीत सुरू असलेली कामे कधीपर्यंत संपणार, असा प्रश्न केला असता, ते मला नको, इमॅजिन पणजीचे अध्यक्ष असलेल्या मुख्य सचिवांना आणि व्यवस्थापकीय संचालकांना हा प्रश्न विचारा, असे ते म्हणाले.
स्मार्ट सिटीअंतर्गत पणजीत बांधण्यात आलेल्या रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी गांजाचे रोपटे आढळून आले होते. त्यानंतर काहीच दिवसांत शीतल हॉटेलपासून मधुबन जंक्शनला जोडणाऱ्या रस्त्याच्या कडेलाही गांजाचे रोपटे आढळून आले. त्यामुळे पणजीत खळबळ माजलेली होती. गांजाची रोपटी नेमकी कशी उगवली, याचा अभ्यास सरकारकडून केला जात आहे.
दरम्यान, स्मार्ट सिटीअंतर्गत पणजीत पुन्हा एकदा कामे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी पुन्हा रस्त्यांची खुदाई करण्यात आलेली आहे. त्याचा मोठा फटका स्थानिक आणि कामांनिमित्त पणजीत येणाऱ्या राज्यभरातील वाहन चालकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर, बाबूश यांना ही कामे कधी संपतील असे विचारताच, ते मला नको मुख्य सचिव आणि इमॅजिन पणजीच्या व्यवस्थापकीय संचालकांना विचारा असे म्हणत ते पत्रकारांवर भडकले.

हेही वाचा