पालिका, एसजीपीडीएला जागा आराखडे सादर करण्याच्या सूचना
मडगाव : येथील एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केट बाहेरील पेव्हर्स घातलेल्या जागेवर एसजीपीडीए व पालिका दोन्ही ठेकेदाराकडून सोपो घेतला जातो. हा वाद मिटविण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका मुख्याधिकार्यांसह पाहणी केली. पालिकेसह एसजीपीडीएला जागेच्या आराखड्यासह ठेकेदारांचे कार्यादेश सादर करण्यास सांगितलेले आहे.
मडगावातील घाऊक मासळी मार्केट बाहेरील पेव्हर्स बसवण्यात आलेली जागा ही मडगाव पालिकेकडून आपली असल्याचे म्हटले आहे तर एसजीपीडीएच्या सोपो ठेकेदाराने ही जागा एसजीपीडीएची असल्याचे सांगत सोपो गोळा केला. यानंतर सोपो कर कुणी गोळा करायचा यावरून सोपो ठेकेदारांमध्ये वाद निर्माण झाला होता.
फातोर्डा पोलिसांना यात मध्यस्ती करावी लागलेली होती. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर आमदार दिगंबर कामत यांनी जिल्हाधिकार्यांसोबत बैठक घेत याप्रकरणी लक्ष घालून या वादावर पडदा टाकण्यास सांगितलेले होते.
त्यानुसार गुरुवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठवाळे यांच्यासह मडगाव पालिका मुख्याधिकारी मेलविन वाझ, एसजीपीडीएतील अधिकारी यांनी एसजीपीडीए मार्केटच्या परिसराची पाहणी केली. यानंतर एसजीपीडीए प्राधिकरणाला मार्केटच्या सीमांकनाचा आराखडा सादर करण्यास सांगण्यात आला आहे.
दोन्ही ठेकेदारांना वर्क ऑर्डर प्रत सादर करण्याच्या सूचना
एसजीपीडीए मार्केट हे घाऊक मासळी मार्केट असताना किरकोळ मासळी कुठे विक्रीसाठी परवानगी दिलेली आहे, याचीही चौकशी केली जात आहे. याशिवाय एसजीपीडीए मार्केटमधील सोपो ठेकेदारासह पालिका सोपो ठेकेदाराला कामाबाबतची वर्क ऑर्डरची प्रत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
याशिवाय मार्केटमधील अस्वच्छ वातावरणाचीही पाहणी करण्यात आली असून तत्काळ उपाययोजना करण्यासाठी सूचना देण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.