सासष्टी : उद्योजक दत्ता नायक यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th January, 03:26 pm
सासष्टी : उद्योजक दत्ता नायक यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

मडगाव : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी काणकोण पोलिसांकडून उद्योजक दत्ता नायक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दत्ता नायक यांनी मडगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यांच्या जामीन अर्जावर १० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. 

    धर्माच्या नावाखाली मठ, मंदिरे भरपूर पैसे लुटतात असे उद्योजक दत्ता नायक यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते. यानंतर सामाजिक शांततेचा भंग करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दत्ता दामोदर नायक यांच्याविरोधात काणकोण पोलीस स्थानकात तक्रार नोंद झाली होती. त्यानंतर पणजी व मडगाव पोलीस स्थानकातही नायक यांच्याविरोधात याचप्रकरणी तक्रारी दाखल झालेल्या होत्या. 

यानंतर काणकोण पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दत्ता नायक यांच्याविरोधात रीतसर गुन्हा नोंद केला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर मंगळवारी नायक यांनी मडगाव येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. गुरुवारी  सुनावणीवेळी काणकोण पोलिसांनी नायक यांच्या जामीनाला विरोध दर्शवताना त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे व त्यामुळे त्यांच्याकडून माहिती व पुरावे गोळा करण्यासाठी अटकेची आवश्यकता असल्याचे मत मांडले. याची दखल घेत मडगाव न्यायालयाकडून अंतरिम दिलासा देण्यास नकार देण्यात आला. नायक यांच्या जामीन अर्जावर १० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.


हेही वाचा