सरकारची उच्च न्यायालयात हमी
पणजी : स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीतील तीन रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले असून ते २० जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. याशिवाय ३१ मार्च २०२५ पर्यंत पणजी परिसरातील काम पूर्ण होऊन रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार अाहेत, अशी माहिती अॅड. देविदास पांगम यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात दिली. दरम्यान, रस्त्याच्या कामामुळे होणारे प्रदूषण व इतर समस्यांवरील उपाययोजनांवर सोमवार, दि. १३ रोजी सुनावणी होणार आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच कामामुळे होणारे धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी न्यायालयात पियुष पांचाल, आॅल्विन डिसा, नीलम नावेलकर आणि ख्रिस्तस लोपीस व सदानंद वायंगणकर यांनी दोन वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या.
याची दखल घेऊन न्यायाधीशांनी पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यात प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाययोजना लागू करण्यास सांगितले. याशिवाय न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन अॅड. अभिजित गोसावी यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली. ते न्यायालयाला मदत करत आहेत.
या प्रकरणी बुधवार, दि. ८ रोजी सुनावणी झाली असता, पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत तीन रस्त्यांचे खोदकाम करण्यात आल्याची माहिती याचिकादारांनी न्यायालयात सादर केली. त्यामुळे प्रदुषण होत आहे. तसेच यासंदर्भात नागरिकांना पूर्वकल्पना दिली जात नसल्याचा मुद्दा याचिकादारांनी न्यायालयात मांडला.
३१ मार्चपर्यंत पणजीतील रस्ते वाहतुकीसाठी खुले
सांतिनेझ जंक्शन ते काकुलो आयर्लंड, पणजी पोलीस स्थानकाच्या समोरचा रस्ता आणि काकुलो माॅल येथील ताडमाड देवस्थान ते मलनिस्सारण प्रकल्पाजवळील रस्ता खोदण्यात आला आहे. हे काम २० जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती अॅड. देविदास पांगम यांनी न्यायालयात दिली. तसेच ३१ मार्च २०२५ पर्यंत पणजी परिसरातील काम पूर्ण होऊन रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार अाहेत.