आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेतलेली, करिअर करणारी, मुले यशस्वी होतात जीवनात. अर्थात पैसा, मोठेपणा हेच जीवन हे मानणार नसाल तर. अर्थात पालकाच्या मानसिकतेतही बदल होतोय आता.
शाळेत शिक्षिकेची नोकरी करताना मी कधीकधी काउन्सिलिंगसुद्धा करीत असे. अर्थात त्याचे रितसर शिक्षण नव्हते माझ्याकडे. पण माझा स्वभाव म्हणा, दुसऱ्यांचा विचार करण्याची सवय म्हणा, खूप पालक आपल्या मुलांबाबत सल्ला घेण्यासाठी येत असत माझ्याकडे. अर्थात त्यात अर्थार्जन हा भाग नव्हता आणि फुकटचा सल्ला असल्याने बऱ्याचदा तो फुकटही जात असे. असो!
असेच एकदा एक पालक आपल्या दहावी पास झालेल्या मुलाला घेऊन आली. मुलगा दुसऱ्या शाळेत असला तरी परिचयाचा. थोडा वेळ इथे तिथे झाल्यावर आईने मुद्द्याला हात घातला. तिचे म्हणणे असे की, माझा मुलगा शेजारच्या रवीपेक्षा हुशार पण दहावीला त्याला ८५ टक्के मार्क मिळाले व ह्याला फक्त ८० टक्के. सगळे वर्ष अभ्यासापेक्षा गॅदरिंग, स्कूल इव्हेंट, पिकनिक, ह्याच्यावरच घालवले वगैरे वगैरे. मी थोडा विचार केला. आधी व्यक्त होऊ दिले तिला, मग शांत झाल्यावर विचारले, “अहो ८० टक्के मार्क्स म्हणजे काय कमी? अहो, तुम्हाला काय रेस हवी होती दोघात कोण जिंकते बघायला?” “अहो, तो रवि एकपाठी अभ्यास करून फक्त ८५ टक्के मिळवले. पण तुमच्या मुलाने १० वी एन्जॉय केली अक्षरश:”
प्रथम तिला कळेना मग मी तिला नुकतीच वाचनात आलेली छोटीशी गोष्ट सांगितली. ससा आणि कासव. गोष्टीत कासव जिंकला शर्यतीत हेच आम्ही वाचले. कासवाचा गौरव झाला. ढाल मिळाली, मेडल मिळाले. सशाला मात्र काहीच नाही मिळाले. अहो, नीट विचार करा, ससा दुसरा आला जरूर पण शर्यत एन्जॉय केली ना त्याने. गाजरं काय खाल्ली, थंड झऱ्याचे पाणी काय प्याला, मऊ मऊ गवताच्या गादीवर झोपला काय, आयुष्यभर लक्षात राहिल अशी शर्यत सश्याची. नंबर मारू झक, पण आपण काय कमावले, अनुभवले हे सश्याला आयुष्यभराकरिता पुरले. कासवाचे काय? मिळालेले मेडल चकाकी गेल्यावर मग काय महत्त्व त्याला? गेले भंगारात.
बाईच्या डोक्यात थोडा प्रकाश पडू लागला. “अहो ताई” मी म्हटले, “तुमच्या मुलाने वेगळे काही नाही केले, अभ्यासाबरोबरच आपल्या आवडत्या क्षेत्रातही आतापासूनच तो पाय रोवणार ना? शाळेत इव्हेंट केले कि मग कॉलेज, मग व्यावसायिक, मग भरपूर काही आणि इतके सगळे करून ८० टक्के मार्क्स काय वाईट आहे? अहो भविष्यात अनेक मार्ग उभे असतील त्याच्यासमोर उत्कर्षासाठी. त्याच्यासमोर रवि तो काय?” बाईंना पटले. आज दहा वर्षांनी तो मुलगा इंजिनिअर तर झालाच पण आता आपल्या आवडत्या कलेत जोमाने करिअर करतोय. अर्थात मोठेपणा नाही हा माझा, पण पालक वेळीच सावरले हे महत्त्वाचे. दुसरा एक प्रकार असतो बघा आईवडिलांचा तो म्हणजे वंश परंपरा, हा एक प्रकार भारी किचकट होतकरू मुलांकरिता. कित्येक तरुण तरुणी ह्या प्रकाराला बळी पडले आहेत. व्हायचे होते एक आणि झाले भलतेच. मग टाकतात बिचारे पाट्या आयुष्यभर.
असाच एक गुजराती फॅमिलितील बाप व मुलगा आले होते भेटायला तसे शेजारीच ते. बापाचा फरसाणचा धंदा जोरात चालू होता. अर्थात गुजराथी परंपरेप्रमाणे मुलाने खानदानी उद्योगात जावे हे बापाचे मत. पण मुलगा एकदम उलट त्याची आवड कॉम्प्युटर, मोबाईल वगैरे. मुलाला धंद्यात इंटरेस्ट नाही. बराच वेळ झकाझाकी झाली. मग मी मुलाला घेऊन समजावले बघ तुला जर तुझ्या आवडत्या क्षेत्रात शिकायला मिळाले, अनुभव मिळाला तर तू त्या फिल्डमध्ये धंदा करशील? मुलाने मान्य केले. मग बापाला विचारले. बघा तुम्हाला मुलगा धंद्यातच हवा नोकरी नको मान्य, पण आपण एक सुवर्णमध्य काढू या. बाप थोडा सावध झाला. मग मी म्हटले, मुलाला कॉम्प्युटरमध्ये शिक्षण घेऊ देत मग द्या त्याला धंदा काढून कॉम्प्युटरचा. यात तुमचे म्हणणेही खरे ठरेल व मुलाचेही स्वप्न साकार होईल.
शेवटी बापच तो तयार झाला एकदाचा. आज बाप व मुलगा दोघांचीही दुकाने बाजूबाजूला आहेत. आज बाप फरसाण विकून एका तासात दोनशे रुपये कमावतो तर पोरगा एक कॉम्प्युटर विकून दोन हजार. सगळे खूश.
आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेतलेली, करिअर करणारी, मुले यशस्वी होतात हो जीवनात. अर्थात पैसा, मोठेपणा हेच जीवन हे मानणार नसाल तर. अर्थात पालकाच्या मानसिकतेतही बदल होतोय आता. म्हणून तर अशोक सराफ यांचा मुलगा प्रसिद्ध शेफ आहे. उद्धव ठाकरे यांचा मुलगा निसर्ग तज्ञ आहे. आहेत अशी भरपूर उदाहरणे. फुकटच्या शर्यतीत मुलांना ढकलून त्यांचे मातेरे करण्यापेक्षा करू देत ना त्यांच्या आवडीप्रमाणे, जगू देता ना त्यांना मुक्तपणे. आपण फक्त लक्ष ठेवायचं. योग्य मार्ग द्यायचा त्यांना पण त्यांच्या कलाने. बघा जीवन कसे सरळ आणि सोप्पं होते ते.
रेशम जयंत झारापकर, मडगाव