नाती स्वीकारायला वेळ लागतोच. दोन्ही बाजूंनी पण ती स्वीकारायची आहेत म्हटल्यावर तो प्रवास सुकर होतो. असाच हा स्वीकार.
व्यक्तिस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र या दोन शब्दांभोवती आपले आयुष्य आजकाल फिरत असते. काहीना काही कारणाने आपली मते दुसऱ्यावर लादणे, आपल्या मनासारखे समोरच्याकडून करवून घेणे आणि तसे झाले नाही तर अकारण नाराज होणे, स्वतःला दुखावून घेणे, त्रास करून घेणे हा मनुष्य स्वभाव असावा कारण कोणत्याही वयाच्या व्यक्तीमध्ये हे दिसून येतेच... प्रमाण आणि तीव्रता कमीजास्त असेल इतकाच काय तो फरक.
लग्न करावे का नाही, मूल होऊ द्यावे का नाही यावर बरेच बघून, लिहून आणि त्यावर लोकांची उलटसुलट मते ऐकून झाली. आता स्वतःला सांगितले की आता या विषयावर अजून काही बघायचे नाही कारण यावर विचारमंथन करून लिहिण्यासारखे असे आता आपल्याजवळ काही नाही. पण याच धाग्याचे दुसरे टोक अचानक हातात आले म्हणून मी त्याचा उगम शोधायचा प्रयत्न केला आणि ‘फुलझडी’ नावाचा एक लघुपट, खरेतर ‘स्वरोवस्की’ यांची जाहिरात माझ्या बघण्यात आली.
विषय व्यक्तिस्वातंत्र्य आणि निर्णयस्वातंत्र्याचाच पण संदर्भ मात्र वेगळा. मागे मी जेव्हा मूल न होऊ देण्याच्या निर्णयस्वातंत्र्याबद्दल लिहिले होते तेव्हा एक विचारप्रवाह समोर आला होता की, आपल्या स्वतःच्या अशा कुटुंबाची ओढ किंवा गरज वाटत नसेल का? प्रत्येक माणूस सारखा असेलच असे नाही त्यामुळे काही जणांना नसेल वाटत ओढ असे मी उत्तर दिले पण त्याचवेळी माझ्या मनात आले की, काही कारणाने जर एखाद्या व्यक्तीचे (मुलगी किंवा मुलगाही) लग्न झाले नाही किंवा काही कारणाने लग्न होऊन टिकले नाही आणि त्यांना मूल जन्माला घालण्याची संधीच मिळाली नाही पण त्यांची तशी इच्छा असेल तर काय? समाजाने आखून दिलेले मैलाचे दगड त्याच क्रमाने ओलांडायला हवेत या अलिखित नियमामुळे विनाकारण नशिबावर दोष देऊन परिस्थितीचा स्वीकार करायचा का?
फुलझडीमध्ये अगदी हिच परिस्थिती दाखवली आहे. एक एकटी, स्वतंत्र राहणारी मुलगी लग्न न करता मुलगी दत्तक घेते. वास्तविक दत्तक घेणे ही प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे आणि अशा एकट्या स्त्रीला मुलगी दत्तक घेताना अनेक कायदेशीर अडचणी येऊ शकतात याची मला जाणीव आहे. पुढेही संगोपनात, शालेय वयात अनेक अडचणी संभवतात पण सध्या चर्चेचा विषय मर्यादित ठेवू आणि एक गोष्ट, कथा म्हणून आपण त्या ओलांडून असे गृहीत धरू की एखाद्या मुलीने असे खरेच केले. काय असेल आईबाबांची प्रतिक्रिया? कदाचित त्यांना हे पटले नसेल तर ठीक आहे. त्यांचेही स्वातंत्र्य आहेच की विचार करण्याचे! पण पटले असेल, समजले असेल पण मान्य करायला जड जात असेल तर? आपल्याकडे लोक काय म्हणतील याचा विचार आपण काय म्हणत आहोत याच्या आधी करण्याची सवय असते. लघुपटातल्या आईला हिच चिंता सतावत असते. लग्न न करता, मूल दत्तक घेते ही गोष्ट तिला लपवावीशी वाटते ती याच कारणासाठी आणि मुलगी मात्र विचारात असते की, यात काय आहे लपवण्यासारखे? मी काही वाईट कुठे केले आहे? पण मुलीचे लग्न करायचे डोक्यात असताना तिने अचानक घेऊन अमलात आणलेला हा निर्णय तसा पचवायला कठीणच. खरेतर एकमेकींच्या मनासारखे दोघीही वागत नसतात त्यामुळेही दोघी दुखावल्या जातात… आई जरा जास्त. त्याच भरात तिच्या तोंडून असे काहीतरी निघून जाते की त्याने ती छोटी, दत्तक घेतलेली मुलगी दुखावते. पण शेवटी आई ही आई असते. तिच्या ते पटकन लक्षात येते आणि गोष्ट मग फक्त संवादातून पुढे जाते. या ५ मिनिटाच्या जाहिरातीचा हा भाग मला फारच आवडला. नात आणि आजीच्या संवादात मग ना आजोबा भाग घेतात ना आई! हे न घडलेले संवादही मला फार बोलके वाटले.
नाती स्वीकारायला वेळ लागतोच. दोन्ही बाजूंनी पण ती स्वीकारायची आहेत म्हटल्यावर तो प्रवास सुकर होतो. असाच हा स्वीकार.
आपल्या मनासारखे वागायला, निर्णय घ्यायला धैर्य लागते. ते निभावून नेणे हे निर्णय घेण्यापेक्षा हजार पटींनी अवघड असेल. ठरलेल्या मार्गावरून चालत राहणे हे काही सोपे नसतेच. प्रत्येक वाटेवर आव्हान असतेच. त्यामुळे दुसरी वाट दाखवली म्हणजे आहे त्या वाटेला कमी लेखले असे नाही. कदाचित हे मान्य असूनदेखील पुढे हे सगळे निभावताना येणाऱ्या अडचणी या सगळ्याची जाणीव असल्यामुळेसुद्धा आईला काळजी वाटू शकते हे नाकारता येत नाही. तिला वाटणाऱ्या अनंत काळज्या योग्य असतीलही पण ‘लोक काय म्हणतील?’ ही काळजी मात्र आपल्या मनातून पुसून टाकण्यासाठी काही काळ जाणार आहे आणि तोवर अशा जाहिराती आणि लघुपट फार उपयोगाचे ठरणार आहेत येवढे नक्की!
लघुपट बघण्यासाठी लेखासोबत दिलेला QR कोड स्कॅन करा.
मुग्धा मणेरीकर, फोंडा