दिवसभरातील थकव्यानंतर रात्री शांतपणे झोप घेण्याचा विचार जरी मनी असला तरी अनेकांना झोप येत नाही. अशा परिस्थितीत नकळत निद्रानाशाचा त्रास सुरू होतो. पण निद्रानाश झाल्याचे सुरुवातीला दिसून येत नाही व त्याचे निदान होत नाही.
झोपेला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. मेंदू, अवयव यांना विश्रांती देणारा कालावधी म्हणजे झोप. डोळ्यांमधील रेटिना या भागापासून मेंदूपर्यंत चेतना जाते. त्यावेळी प्रकाश, अंधार यांच्याबरोबर शारीरिक व मानसिक थकवा अनुभवला जातो. यानुसार माणसाला साधारणपणे २४ तासात सहा ते आठ तास शांत झोप आवश्यक मानली जाते. हे चक्र बिघडल्यास झोप वेळेवर नसणे किंवा ती न येणे हे प्रकार दिसतात. दिवसभरातील थकव्यानंतर रात्री शांतपणे झोप घेण्याचा विचार जरी मनी असला तरी अनेकांना झोप येत नाही अथवा झोप घेणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत नकळत निद्रानाशाचा त्रास सुरू होतो. पण निद्रानाश झाल्याचे सुरुवातीला दिसून येत नाही व त्याचे निदान होत नाही.
नैसर्गिक दैनंदिन जीवनचक्रामध्ये वेळेवर झोपे न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकवून ठेवता न येणे, झोपेची वेळ पूर्ण झाली तरी सुद्धा झोप पूर्ण न झाल्यासारखे वाटणे आणि काही जणांमध्ये अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न येणे याला आपण ‘निद्रानाश’ असे म्हणतो.
निद्रानाशाची कारणेः
आयुष्यातील महत्त्वाच्या तणावकारक घटना जसे जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्फोट, अचानक नोकरी जाणे, शारीरिक आजारपण आणि वेदना, भावनात्मक ताणतणाव, औषधांचे साइड इफेक्ट्स, नैराश्य, दबलेली असुरक्षितता, भीती ही निद्रानाश होण्याची काही कारणे असू शकतात. यासोबत नोकरी किंवा कामाच्या ठिकाणी सततच्या नाइट शिफ्ट्स किंवा बदलत्या शिफ्ट्स, कमकुवत पचनसंस्था, प्रवासामुळे झोपेचे बिघडलेले चक्र, व्यसन, मोबाइल किंवा इंटरनेटचे व्यसन आणि एखाद्या जुन्या घटनेमुळे ताण- तणावाचा आजार या गोष्टींमुळे निद्रानाशाला सामोरे जावे लागू शकते. म्हातारपणातही झोपेच्या पद्धतीवर परिणाम होतो आणि बहुतेक लोकांना रात्री झोप न लागणे, कमी झोप यासारख्या समस्या दिसू लागतात.
महिला आणि निद्रानाशः
महिलांमध्ये झोपेशी संबंधित समस्या अधिक दिसतात. कारण महिलांमध्ये गर्भधारणा तसेच रजोनिवृत्तीदरम्यान हार्मोनल असंतुलनाची समस्या उद्भवते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाशाची समस्या जडण्याची शक्यता जास्त असते. ४ पैकी १ महिलेला निद्रानाशाचा त्रास होतो. तर ५ पैकी १ पुरुषाला निद्रानाशाचा त्रास उद्भवतो. सर्वसाधारणपणे, स्त्रियांना पुरुषांपेक्षा झोपायला जास्त वेळ लागतो.
निद्रानाशाची लक्षणेः
निद्रानाशामध्ये प्रामुख्याने मधुमेह, हृदयविकार, पचनाच्या तक्रारी आणि इतर शारीरिक तसेच मानसिक व्याधी होऊ शकतात. तसेच दिवसभर ग्लानी येणे, थकवा वाटणे, चिडचिड होणे, कुठल्याही गोष्टीत एकाग्रता न वाटणे, स्मरणशक्ती कमी होणे, निरुत्साही वाटणे, निर्णय घेण्याची क्षमता घटणे, वजन वाढणे, प्रतिकार शक्ती कमी होणे ही लक्षणे दिसून येतात.
झोपेच्या दोन मुख्य अवस्था असतात. ‘रॅपिड आय मुव्हमेंट’ (आरईएम स्लीप) या सुरुवातीच्या अवस्थेत पापण्यांची फडफड, स्वप्ने पडणे या गोष्टी घडतात. पुढील अवस्था ‘नॉन आरईएम स्लीप’, यामध्ये आपण साधारण तीन पायऱ्यांमध्ये जास्तीतजास्त गाढ झोपेत जातो. ही खूप महत्त्वाची आणि गाढ झोप असते. झोपेच्या या अवस्था आलटून पालटून येत असतात आणि त्यांचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. आपण खूप वेळ झोपतो, तरी झोप झाल्यासारखी वाटत नाही, फ्रेश वाटत नाही. अशा वेळी गाढ झोपेची पायरी खूप कमी वेळा येते, कमी काळ टिकते व निद्रानाश होतो.
सौम्य निद्रानाशाचा त्रास असल्यास काही गोष्टींचे नियमित पालन करा. रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची विशिष्ट वेळ ठरवून ती काटेकोरपणे पाळा. संध्याकाळनंतर चहा, कॉफीचे सेवन टाळा. नियमित व्यायाम करा. रात्री उशिरा जड जेवण घेऊ नका. व्यायाम, रात्रीचं जेवण व झोप यामध्ये अंतर ठेवा. झोपण्यापूर्वी शक्य असल्यास ध्यान-धारणा करा, संगीत ऐका. मनामध्ये काळजी किंवा अस्वस्थ करणारे विचार येत असल्यास, त्यांची एक यादी बनवून त्यावर सोयीनुसार दिवसातला वेळ ठरवून विवेकपूर्वक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. विश्रांतीची तंत्रे जाणून घ्या. ही तंत्रे मन आणि शरीर शांत करण्यात मदत करतात.
तीव्र निद्रानाशाचा त्रास असल्यास तज्ज्ञांना भेटा. कारण निद्रानाशाच्या कारणांच्या मुळाशी जाऊन उपचार करणे आवश्यक असते. निद्रानाशाच्या मागे असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक कारणांचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे असते. औषधे तसेच तणाव नियंत्रणाचे तंत्र, स्व-संमोहन थेरपी, स्लीप रेस्टरिक्शन थेरपी, री कंडिशनींग थेरपी, बिहेविअरल थेरपी असे विविध उपचार त्यावर उपयुक्त असतात.
डॉ. श्वेता राऊत मुळगांवकर