वरूण तिशीतला तरूण. चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला. पण बैठे काम अन् त्यावर शिफ्ट ड्यूटी. ना नियमित जेवणाच्या वेळा ना झोप. हळूहळू गॅसेस, अपचनच, पोट साफ होत नाही म्हणता म्हणता बद्धकोष्ठतेची समस्या सुरू झाली.
तर बद्धकोष्ठता किंवा ‘कॉन्स्टिपेशन’ हा शब्द आपल्या कानावरून कधी गेला नाही असं होणारच नाही. पचनप्रक्रियेला अगदी सतावून ठेवणाऱ्या बद्धकोष्ठता या समस्येचा अनुभव अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला जीवनात कधी ना कधी येतोच. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, झोप पूर्ण न होणे, तणाव आणि अनियमित जीवनशैलीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढताना दिसून येते.
बद्धकोष्ठता म्हणजे काय?
बद्धकोष्ठता ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये मल पचनमार्गातून खूप हळू पुढे सरकते आणि कोरडे व कडक होते. बहुतांश घटनांमध्ये, मोठ्या आतड्यात येणाऱ्या अन्नातील पाणी जास्त शोषले गेल्यामुळे ही समस्या उद्भवते. आपल्या आतड्यांमधून जेवढे हळू अन्न पुढे जाते, तेवढेच जास्त पाणी मोठे आतडे अन्नातून शोषून घेते. यामुळे मल कोरडे आणि कडक होत जाते. हा त्रास सुरू झाला की, साधारणपणे आपण जितक्यावेळा शौचास जातो त्यापेक्षा कमी वेळा जाऊ लागतो, मलविसर्जनाच्या वेळेस ताण येऊ लागतो, शौचाची जागा कोरडी होते. काहीवेळा तर मुळव्याध, फिशर, सूज येणे असा गंभीर स्वरूपाचा त्रासही होतो.
बहुतेक लोकांना अधूनमधून बद्धकोष्ठतेचा त्रास होतोच पण काही विशिष्ट स्थितींमध्ये लोकांना दीर्घकालीन बद्धकोष्ठतेचाही त्रास होण्याची शक्यता असते. काही न्यूरोलॉजिकल आणि पचन विकार असल्यास, मंद पचनशक्ती आणि कमी स्नायूंच्या आकुंचन शक्तीमुळे वृद्ध लोकांमध्ये, कमी फायबरयुक्त आहार घेत असल्यास, गर्भवती महिलांना हार्मोनल बदलांमुळे बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठतेची लक्षणे बद्धकोष्ठता असल्यास भूक न लागणे, कोरडे आणि कठीण मल होणे, सूज येणे किंवा मळमळ होणे, आठवड्यातून तीनपेक्षा कमी आतड्याची हालचाल, ओटीपोटात वेदना आणि क्रॅम्प्स ही लक्षणे दिसतात.
बहुतेक वेळा आपण बद्धकोष्ठता म्हणजे ‘बिघडलेली पचनसंस्था’ व हे सगळ्यांना सामान्यपणे होते असं सरळसोट विचार करून निमूट सहन करत राहतो. पण सहन करत राहण्यापेक्षा त्यावर उपचार घेतल्याने पुढील समस्या टाळल्या जाऊ शकतात.
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी व पचनक्रिया तंदूरूस्त ठेवण्यासाठी आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. दही, पनीर व दुग्धजन्य पदार्थ आहारात ठेवल्याने त्यातील प्रोबायोटिक्समुळे आतड्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. फायबरयुक्त खाद्यपदार्थ जसे हिरव्या पालेभाज्या, कोबी, रताळे, पडवळ, भेंडी, गाजर, वांगी व फळांमध्ये सफरचंद, संत्री, द्राक्षे, डाळिंब, केळी इत्यादी फळांचे सेवन पचनसंस्था उत्तम राहण्यास मदत होते. बाजरी, ब्राऊन राईस, ओटमील यामध्येही भरपूर प्रमाणात फायबर असते. रोज भरपूर पाणी प्यायल्याने संपूर्ण शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते व बद्धकोष्ठतेपासून बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो. मसूर डाळ, हरभरा, राजमा आणि तूरडाळ यांसारख्या डाळी आणि कडधान्यांमध्ये पोषकतत्वांचे प्रमाण भरपूर असते व ते पचन सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठता केवळ फायबर, द्रवपदार्थ आणि औषधांपुरती मर्यादित न राहता पेल्विक फ्लोर फिजिओथेरपी किंवा योग्य बाऊल हालचालीमुळे देखील बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.
बद्धकोष्ठता ही कायस्वरुपीची समस्या आहे हा गैरसमज अनेकांमध्ये दिसून येतो. मात्र योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांचे सेवन केल्यास बध्दकोष्ठतेची समस्या आटोक्यात आणली जाऊ शकते.
बद्धकोष्ठतेची कारणे - मोठ्या आतड्यातून मलाची कमी हालचाल - पुरेसे पाणी न पिणे
बैठे काम व व्यायामाचा अभाव - आतड्यांसंबंधी समस्या - तळलेले, तिखटमीठ असलेल्या मसालेदार पदार्थांचे अतिसेवन, फायबरयुक्त पदार्थांचा अभाव, मैदा जास्त खाणे, चहा-कॉफी-मांसाहार जास्त घेणे.
अवेळी झोपणे, झोप अपुरी होणे - जेवणाच्या बदलत्या वेळा, गरजेपेक्षा कमी खाणे, भूक लागल्याशिवाय खाणे आणि न चावता खाणे.
थायरॉईड विकार आणि मधुमेह, वेळीच मलविसर्जन न करणे, गरोदर असणे, आयबीएस आजार, मानसिक तणाव यासारख्या स्थिती बद्धकोष्ठता वाढवतात.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर