जगण्याला वळण देणारी परिस्थिती…

माणसाचं वय नाही तर त्याच्यावर ओढावलेली परिस्थिती त्याला जबाबदारीची जाणीव करून देत असते. जेव्हा एखादी परिस्थिती आपल्यावर येते व त्याला आणखी पर्याय नसतो तेव्हा, आपण ती परिस्थिती स्वीकारतो.

Story: ललित |
11th January, 04:18 am
जगण्याला वळण देणारी परिस्थिती…

वय नाही, तर परिस्थिती 

जबाबदारीची जाणीव करून देत असते!

न पायात चप्पल

न उन्हाची भीती

पोटासाठी ओढावी लागते न झेपणारी गाडी...

संध्याकाळी समुद्रावर एक फेरी मारून येऊया म्हटलं. फार गर्दी होती. काही जण आपली छोटीछोटी दुकानं उघडून आपलं पोट चालवत होती. त्यात नजर गेली ती त्या एका छोट्याशा मुलावर जो एक आईस्क्रीमची गाडी ढकलत होता. त्याच्या वजनाहून दहापट जास्त वजन होतं त्या गाडीला. मात्र हार न मानता त्या रेतीत त्या गाडीला इकडून तिकडे फिरवत होता. कदाचित, हा त्याचा स्वत:चा व्यवसाय नसावा. तो आणखी कुणाजवळ तरी काम करत असावा.

जन्म कोणाच्या पोटी घ्यायचा हे जर आपल्या हाती असतं तर, आपण प्रत्येकाने श्रीमंत आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला असता. हो ना? कारण श्रीमंतीत जगणं सर्वांना आवडतं. मात्र पैसा असला म्हणजे प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकत नाही. काही गोष्टी अनुभवायला आपला स्वभाव मनमिळावू असावा लागतो. आपल्यावर आलेली परिस्थिती आयुष्यभर तशीच राहत नाही, तर ती बदलते. दु:खाचा डोंगर जरी कोसळला तरी काही दिवसांनी आपण त्यातून सावरण्याचा प्रयत्न करतो व हळूहळू त्यातून स्वत:ला सावरतो. मात्र एक गोष्ट आपण सतत लक्षात ठेवली पाहिजे की, आयुष्य म्हटलं की सुख आणि दु:ख या दोन गोष्टींचा त्यात सहभाग असतो व आलेल्या परिस्थितीवर आपल्याला सामोरं जावंच लागतं. त्रास होतील, मात्र ते त्रास आयुष्यभरासाठी नसतील त्यांचे रूपांतर सुखात, आनंदात सुद्धा होऊ शकतं मात्र आपण आपल्या विचारात बदल करु तेव्हाच.

माणूस जसाजसा मोठा होत जातो, तशी त्याला जबाबदारीची जाणीव होत जाते. असं म्हटलं जातं वयानुसार नाही, तर त्या एखाद्या माणसावर आलेली परिस्थिती त्या माणसाला खूप काही गोष्टी शिकवून जाते. हा दहा-बारा वर्षांचा मुलगा. हे वय मजामस्ती करायचं, तर या वयात तो मुलगा काम करून, कष्ट करून, आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचं पोट भरत आहे. कदाचित त्याला त्याच्या वयाच्या इतर मुलांना पाहून वाटत असेल की, आपणसुद्धा त्यांच्यासारखं शाळेत जावं, मजामस्ती करावी, आईवडिलांसोबत फिरायला जावं, त्यांच्यासोबत खेळावं. पण लहान वयात त्याच्यावर आलेली ही परिस्थिती त्या परिस्थितीने त्याला या सगळ्यांपासून दूर केलं. मात्र त्या परिस्थितीने त्याला ‘जबाबदारी’ शब्दाचा अर्थ त्या लहान वयात करून दिला. त्या मुलाने ती परिस्थिती स्वीकारली. त्या रेतीतून ती गाडी ओढणे त्याच्यासाठी खूप अवघड काम आहे. मात्र हार मानून जमणार नाही कारण काम केलं तर पोट भरणार याची त्याला जाणीव आहे. वयाने मोठ्या असलेल्या माणसाला प्रत्येक गोष्टी समजतात, कळतात असं प्रत्येक वेळी नाही होत. कधीकधी त्या एखाद्या माणसावर आलेली परिस्थिती खूप काही शिकवून जाते. त्या लहान वयातसुद्धा. 

प्रत्येकाला वाटतं की बालपणाचा काळ सुखाचा. मात्र काहींना बालपणाचा काळ आठवला की अंगावर शहारे उभे राहतात. कारण काहीचं बालपण फार खडतर गेलेलं असतं. नसतं प्रत्येकाच्या नशिबी ते सुख, आनंद. काहींना लहान वयात मोठं व्हावं लागतं, जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. कारण ती परिस्थिती स्वीकारणे हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे असतो. त्या मुलाने त्यांच्यावर आलेली ती परिस्थिती स्वीकारली. त्या समुद्रावर आईस्क्रीमची गाडी चालवणे, कोणी विकत घेतं का, याची वाट पहाणे. त्यात काही जण त्याच्यावर ओरडतात, त्यांना हाकलूनसुद्धा देतात. जर समजा लहान मुलांनी आईस्क्रीमचा हट्ट धरला की मुलांच्या आई-वडिलांना मुलांना सर्दी होईल याची काळजी तर, त्या बिचार्‍याला कधी आपली आईस्क्रीम संपेल याची काळजी. वय लहान असल्यामुळे त्याच्याकडे दुसरं काही काम होणार नाही. त्याचबरोबर परिस्थितीमुळे त्याचं शिक्षणसुद्धा झालेलं नसावं. वयाने लहान असल्याने कोणी कामाला ठेवायला सुद्धा पाहत नाही. आपण बारीक विचार केला तर आपल्याला कळून येईल की, त्या बिचाऱ्याला महिन्याचा पगार अंदाजे किती असेल, त्या पगारातून संपूर्ण महिना काढणे हे त्याच्यासाठी किती कठीण जात असेल. कदाचित काही दिवस उपाशी काढावे लागत असतील किंवा स्वत:चं पोट मारून कुटुंबाला खायला देत असेल. 

आज आपल्या गोव्यामध्ये इतर राज्यातील माणसं छोटेमोठे व्यवसाय करून आपलं पोट चालवत आहेत. घरकाम करणारी माणसं कामाला येताना आपल्या मुलांनासुद्धा घेऊन येतात. लहान मुलं मातीत खेळतात तर सातआठ वर्षाची मुलं आपल्या आई-वडिलांना कामात मदत करतात. कोणी पाणी भरतं तर, कोणी लहानलहान दगड नेण्याचं काम करतात. या माणसांना ‘शिक्षणाचे’ महत्त्व माहीत नाही असं नाही. त्या माणसांवर ओढावलेली परिस्थिती त्यांना या गोष्टीपासून लांब ठेवत आहे. जिथे त्यांना काम मिळेल तिथे त्यांना पळावं लागतं, आपल्या कुटुंबासकट. कारण मिळालेलं काम किती दिवस चालेल, त्यानंतर ते काम संपलं की, दुसरीकडे. या कारणामुळे त्यांना एकाच ठिकाणी राहता नाही येत. म्हणून या माणसांना शिक्षण घ्यायला जमत नाही व त्यांची तशी परिस्थिती नसल्याकारणाने तेवढा खर्च करणे त्यांना जमत नाही. जरी या मुलांना सरकारी शाळांमध्ये घातलं तरी, आज एवढे कार्यक्रम शाळेमध्ये केले जातात की प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळे कपडे. त्यात डोनेशन्स (जास्त डोनेशन नसेल पण थोडेफार तरी घेतले जाते) त्यात अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे, आपलीच माणसं त्यांना खालच्या नजरेने पाहतात, त्यांना समान वागणूक मिळत नाही. 

माणसाचं वय नाही तर त्याच्यावर ओढावलेली परिस्थिती त्याला जबाबदारीची जाणीव करून देत असते. जेव्हा एखाद्या गोष्टीला दुसरा पर्याय असतो तेव्हा, आपण त्या गोष्टीचा तेवढा भार घ्यायला बघत नाही. पण जेव्हा अशी एखादी परिस्थिती आपल्यावर येते व त्याला आणखी पर्याय नसतो तेव्हा, आपण ती परिस्थिती स्वीकारतो. मग त्या परिस्थितीत जे आपल्यासमोर येईल त्याला आपण सामोरे जातो. त्यावेळी आपण अशा काही गोष्टी देखील करतो ज्या आपण कधी केल्या नसतील किंवा त्या गोष्टीची आपल्याला भीती वाटेल असेल त्या गोष्टी आपण धीराने करतो. ३० - ३५ वर्षांचा माणूस आपल्या आई-वडिलांच्या पैशांवर आपलं जीवन जगत आहे. स्वतः नोकरी करावी, स्वतः कमवावं, स्वतःच्या पायावर उभे राहावं, याची त्याला अजून जाणीव नाही. तर दुसऱ्या बाजूला २० - २५ वर्षाचा मुलगा शिक्षणाबरोबर काही वेळ तीन - चार तास कोणाकडे काम / नोकरी करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचा आधार बनण्याचा प्रयत्न करत आहे. माणूस वयाने मोठा होत नसतो तर, त्याच्यावर आलेली परिस्थिती त्याला मोठं करीत असते.


हर्षदा सावंत, सावंतवाडा, मांद्रे.