सहा आठवड्यांत नियुक्ती करण्याची व्यवस्थापनाकडून न्यायालयाला ग्वाही
पणजी : याचिकादार शिक्षिकेची (teacher) मुख्याध्यापक पदावर सहा आठवड्यांत नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती पणजी येथील प्रोग्रेस हायस्कूलच्या व्यवस्थापनाकडून गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. याची दखल घेऊन मुख्याध्यापक पदासंदर्भात दाखल केलेली याचिका निकालात काढण्यात आली आहे.
या प्रकरणी मित्रा नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी राज्य सरकार, सारस्वत शैक्षणिक संस्था, प्रोग्रेस हायस्कूल, शिक्षण संचालनालय आणि मारिया रिबेरो यांना प्रतिवादी केले होते.
प्रोग्रेस हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका रेश्मा गावकर ३१ मार्च २०२४ रोजी निवृत्त झाल्या. त्यानंतर मुख्याध्यापक पदावर याचिकादार मित्रा नाईक बढती मिळण्यास पात्र असलेल्या सर्वांत ज्येष्ठ शिक्षिका आहेत. तथापि, त्यांच्या दाव्याकडे दुर्लक्ष करून आणि नियमित पदोन्नतीची प्रक्रिया लटकवून ठेवण्यात आली. तसेच याचिकादार नाईक यांना बाजूला ठेवून व्यवस्थापनाने त्यांच्यापेक्षा खूपच कनिष्ठ असलेल्या मारिया रिबेरो यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सोपवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. याला विरोध करून याचिकादार मित्रा नाईक यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वरील मुद्दा मांडला. तसेच सदर पदावर आपली नियमित नियुक्ती करण्याची मागणी केली.
या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, सहा आठवड्यांच्या आत प्रोग्रेस हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदावर नियमित पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती सारस्वत शैक्षणिक संस्थेतर्फे अॅड. पराग राव यांनी दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिका निकालात काढली आहे.