कोलकाता : कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला सियालदह न्यायालयाने १६४ दिवसांनंतर सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आज दुपारी १२.३० वाजता न्यायालयाने दोषी संजय, सीबीआय आणि पीडित कुटुंबाच्या वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले. न्यायाधीश अनिर्बन दास यांनी संजयला बोलण्याची संधी दिली होती. यावेळी संजयने आपण निर्दोष असल्याचे म्हटले.
१६० पानांचा निर्णय, १६२ दिवसांत लागला निकाला
१८ जानेवारी रोजी न्यायालयाने संजयला दोषी घोषित केले होते. सत्र न्यायाधीश अनिर्बन दास यांनी घटनेच्या १६२ दिवसांनंतर हा निकाल दिला.शिक्षेबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. संजयच्या शिक्षेसाठी १६० पानी निर्णय लिहिण्यात आला असून. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४, ६६ आणि १०३ (१) अंतर्गत संजय दोषी आढळला आहे.
१) कलम ६४ (बलात्कार): किमान १० वर्षे तुरुंगवास आणि कमाल जन्मठेपेची तरतूद.
२) कलम ६६: किमान २० वर्षांच्या शिक्षेची तरतूद, जन्मठेपेचे प्रावधान
३) कलम १०३(१) (हत्या): फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची तरतूद.
निर्णयला न्यायवैद्यक अहवालाचा आधार
न्यायालयाने घटनास्थळाच्या फॉरेन्सिक अहवालास शिक्षेचा आधार बनवले. घटनास्थळी आणि पीडित डॉक्टरच्या शरीरावर संजयचा डीएनएही सापडला होता.
८-९ ऑगस्टच्या रात्री आरजी कार हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. ९ ऑगस्टला सकाळी डॉक्टरांचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी १० ऑगस्ट रोजी संजय रॉय नावाच्या नागरिक स्वयंसेवकाला अटक केली. या घटनेबाबत कोलकात्यासह देशभरात निदर्शने झाली. बंगालमध्ये २ महिन्यांहून अधिक काळ आरोग्य सेवा ठप्प होत्या.