देश : कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

५० हजारांचा दंडही : अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा आदेश


4 hours ago
देश : कोलकाता बलात्कार, हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेप

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
कोलकाता : येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय याला सोमवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला शनिवारी दोषी ठरवले होते. त्याला सियालदह न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बान दास यांनी शिक्षा सुनावली. त्याला न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीला शिक्षा सुनावली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात होता. खटल्याच्या ५७ दिवसांनंतर न्यायालयाने निकाल दिला. कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला दुसऱ्या दिवशी अटक केली होती. दोषी संजय रॉयवर कलम ६४ (बलात्कार), कलम ६६ (मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल शिक्षा) आणि कलम १०३ (खून) अंतर्गत आरोप ठेवण्यात आला आहे.
पीडितेच्या कुटुंबाला १७ लाखांची भरपाई द्या!
सुनावणीदरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने संजय रॉयला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. पीडितेच्या पालकांच्या वकिलांनीही कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यास नकार देत हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून वर्गीकृत केला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. यावेळी राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबाला १७ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.

हेही वाचा