गुन्हेवार्ता : ड्रग्स तस्करीप्रकरणी दोघांवर आरोपपत्र दाखल; पुढील सुनावणी २४ जानेवारीला

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
गुन्हेवार्ता : ड्रग्स तस्करीप्रकरणी दोघांवर आरोपपत्र दाखल; पुढील सुनावणी २४ जानेवारीला

पणजी : गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने गिरी-म्हापसा येथे सप्टेंबर २०२४ रोजी छापा टाकून ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी तपासपूर्ण करून गुन्हा शाखेने संशयित महिला आशा अजय लाक्रा (४०, मूळ छत्तीसगड) आणि नायजेरियन नागरिक उगेवूलिहे संडे उगेवूओके (ugewulihe sunday ugwuoke) या दोघा विरोधात पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात २८१ पानी आणि २३ साक्षीदारांची साक्ष नोंद करून आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे.

या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने १९ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, गिरी म्हापसा येथे रमाकांत कवठणकर याच्या भाड्याच्या खोलीत राहणारी एक परप्रांतीय महिला ड्रग्ज तस्करीत गुंतल्याची माहिती एका अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर, महिला हवालदार स्नेहा जावेर, हवालदार ईर्शाद वाटांगी, कॉ. नवीन पालयेकर, कल्पेश शिरोडकर, महाबळेश्वर सावंत, अनीश तारी, कम्लेश धारगळकर, कॉ. रोशनी शिरोडकर व इतर पथकाने १९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान अग्निवाडा गिरी येथील रमाकांत कवठणकर यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत छापा टाकला. त्यावेळी त्या खोलीत राहणाऱ्या आशा अजय लाक्रा (४०, मूळ छत्तीसगड) या महिलेला ताब्यात घेऊन खोलीची झडती घेतली. तिच्या पर्समधून पथकाने ६.८ लाख रुपये किमतीचे ११८.५३७ ग्रॅम २६८ एमडीएमए व अॅक्टसीच्या गोळ्या जप्त केल्या. जप्त केलेला ड्रग्स व्यावसायिक स्वरूपाचा असल्याचे प्रथमदर्शनी अहवाल आला.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी आशा लाक्रा हिच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर तिची कसून चौकशी केली असता, तिने एमडीएमए व अॅक्टसीच्या गोळ्या एका नायजेरीयन नागरिकाकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार, गुन्हा शाखेने उगेवूलिहे संडे उगेवूओके या नायजेरीयन नागरिकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. गुन्हा शाखेच निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी तपासपूर्ण झाल्यानंतर वरील दोघा संशयिताविरोधात पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात २८१ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात २३ साक्षीदारांची साक्ष नोंद केली आहे. दरम्यान वरील प्रकरण म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे. 

हेही वाचा