उसगाव ग्रामसभेत पार-उसगाव ते तिस्क-उसगावपर्यंतच्या बगल रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्याचा ठराव

स्थानिक तरुणांना रोजगार आणि इतर विषयांवर देखील चर्चा झाली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
उसगाव ग्रामसभेत पार-उसगाव ते तिस्क-उसगावपर्यंतच्या बगल रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्याचा ठराव

फोंडा : तिस्क- उसगाव ते खांडेपार पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच. अपघातात अनेकांचा नाहक बळी देखील गेलेला आहे. दरम्यान आज रविवारी उसगांव ग्रामसभेत अपघाताच्या घटना रोखण्यासाठी अनेक उपाय योजना पंचायत मंडळाला सुचवण्यात आल्या. दरम्यान याच अनुषंगाने पार-उसगाव ते तिस्क-उसगाव पर्यंतच्या बगल रस्त्यावर उड्डाण पूल उभारण्याचा महत्वपूर्ण ठराव उसगाव पंचायतीच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. 

सरपंच रामनाथ डांगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेत पंचायतीचे अतिरिक्त सचिव मयूर कुडाळकर व अन्य पंच सदस्य उपस्थित होते. अपघातावर नियंत्रण येण्यासाठी ठोस उपाय योजणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक पंचायती मार्फत  परिसरात उड्डाणपूल उभारण्याचा ठराव बांधकाम खात्याला तथा राष्ट्रीय महामार्ग खात्याकडे पोहचवणे गरजेचे आहे. तरच या मार्गावरील अपघातांवर नियंत्रण येऊ शकते असे सरपंच रामनाथ डांगी म्हणाले. 

उसगाव भागात औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या आहेत.  या कंपन्यामध्ये स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामसभेत वारंवार प्रश्न उपस्थित केला जातो. पण औद्योगिक वसाहती कार्यरत कंपन्यामध्ये  इतर भागातील कामगारांची भरती केली जाते. स्थानिक पंचायतीने यासंदर्भात ठोस उपाय करण्याची मागणी करून ग्रामस्थांनी आवश्यक ठराव घेतला. मागील पंचायत सचिवाविरोध विनयभंगाची तक्रार पोलीस स्थानकात नोंद झाली. एकूणच कायदेशीर प्रक्रियेवरील ग्रामस्थांनी प्रश्न विचारले. त्यावर सरपंच रामदास डांगी यांनी दिलेल्या उत्तरावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.  

ग्रामसभेबरोबर पंचायत मंडळ सुद्धा उड्डान पूल उभारण्यासाठी ठराव घेऊन संबंधित खात्याला पाठविणार आहे. स्थानिकांना औद्योगिक वसाहतील्या कंपन्यांमध्ये रोजगार देण्यासाठी सुद्धा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे चर्चा केली जाईल. तसेच सर्वेक्षणाबद्दल अधिक माहिती देताना सर्व घरांचे सर्वेक्षण  पंचायती मार्फत करण्यात आले असल्याचे  सरपंच रामनाथ डांगी यांनी सांगितले.