गोव्यातील तरुण आळशी नाहीत. ते आळशी असते तर जहाजांवर, आखाती देशांमध्ये, युरोपीयन देशांमध्ये, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या भागांत गोव्यातील तरुण कामासाठी गेलेच नसते. त्यांना इथे सुरक्षित नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून ते सातासमुद्रापार नोकऱ्यांसाठी जातात.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील तरुणांना आळशीपणा सोडून कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. ‘पोर्तुगीजांनी गोवेकरांना आळशी केले. गोवेकर म्हणजे सुशेगाद अशी ओळख तयार करून ठेवली. आपण पिढ्यान पिढ्या आळशीपणाच्या मानसिकतेत अडकून पडलो आहोत. यातून बाहेर पडण्यासाठी कामात गुंतवून घ्या. जेव्हा तुम्ही बिझी असता तेव्हा तुम्ही लेझी नसता,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील तरुणांना आळशीपणा सोडा नाहीतर बाहेरील राज्यांतून येणारे लोक तुमच्या हक्काचे काम घेतील, असा इशाराही दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी युवकांना उत्स्फूर्तपणे सुचलेल्या आणि खऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी इथल्या युवकांना सावध करण्यासाठी परप्रांतियांकडून घेतल्या जाणाऱ्या नोकऱ्यांच्या विषयालाही बोलता बोलता स्पर्श केला. गोव्यातील उद्योगांमध्ये परप्रांतियांची संख्या जास्त आणि गोवेकरांची कमी अशी आजची सद्यस्थिती आहे. परराज्यांमधून गोव्यात स्थायिक झालेल्यांची मुले आज निवासी दाखला मिळवून सरकारी सेवेतही भरती होत आहेत. सर्व खात्यांमध्ये गोव्याबाहेरील आडनावाचे लोक आज दिसतात. स्थायिक झालेले आज ‘गोंयकार’ झाले आहेत. त्यांना आता बाहेरचे म्हणता येणार नाही, हेही तितकेच खरे. पण यापुढे बाहेरून येणारे गोवेकरांच्या नोकऱ्या बळकावतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. भविष्यात गोमंतकीय कुठे? हा प्रश्न येईल.
इथल्या राजकीय व्यवस्थेने परप्रांतियांच्या वस्त्या तयार केल्या. त्यातून त्यांना मतदार मिळाले आणि त्या मतदारांना त्या मोबदल्यात सुविधा आणि नोकऱ्या मिळाल्या. गोवेकरांवर होणाऱ्या अन्यायाला इथले राजकीय नेते खरे जबाबदार आहेत. स्थानिकांना नोकऱ्या, न्याय देण्यासाठी सरकारकडे कुठलेच धोरण नाही. मूळ गोवेकरांना राजसत्तेचे गुलाम बनवून ठेवण्यातच राजकारणी धन्यता मानतात. ‘तुम्हाला नोकऱ्या देतो, नोकऱ्या नाहीत तर टुर्नामेंटसाठी पैसे देतो, ते नाही तर फुगड्यांच्या स्पर्धा घेतो पण कुठे जाऊ नका. आमचेच झेंडे घेऊन फिरा,’ असे सांगून युवकांना इथल्या नेत्यांनी झुलवत ठेवले. तुमच्या गुणवत्तेवर, कर्तृत्वावर, स्वबळावर काम मिळवा, पडेल ते काम करा ही शिकवण दिली जात नाही. सरकारी योजनांतून वृद्धांना पैसे, गृहिणींना पैसे, युवकांना आमिषे यामुळेच खरा ‘गोंयकार’ आज काहीसा भरकटला आहे. तो सुशेगाद झाला आहे. पण तो आळशी आहे असे म्हणता येणार नाही. इथल्या व्यवस्थेने त्यांना काहीसे बेफिकीर बनवले असेल पण गोवेकर हा मेहनती आहे, कुशल आहे. त्यामुळेच तो जगाच्या पाठीवर कुठेही काम करू शकतो.
मुख्यमंत्र्यांनी आळशीपणा सोडण्याविषयी केलेले विधान हे सरसकट गोवेकरांना लागू होत नाही. त्यामुळे सर्व गोमंतकियांना तसे म्हणणेही अयोग्य आहे. त्यापेक्षा गोवेकरांना हक्काच्या नोकऱ्या मिळतील याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. मुख्यमंत्र्यांनी गोव्यातील तरुणांनी सरकारी नोकऱ्यांमागे न धावता खासगी क्षेत्रातही चांगल्या नोकऱ्या आहेत त्या मिळवा, असे सांगतानाच त्या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वतःहून गोव्यात निर्माण होणाऱ्या चांगल्या, सुरक्षित नोकऱ्या मग त्या खासगी असोत किंवा सरकारी त्या गोवेकरांना मिळतील यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. राज्यातील खासगी उद्योगांमध्ये भरली जाणारी नोकऱ्यांच्या पदांची माहिती सर्वांना कळावी यासाठी ती एका ठिकाणी प्रसिद्ध करण्याची तरतूद करायला हवी. अनेक कंपन्या आपल्या नोकरीच्या पदांची जाहिरातही प्रसिद्ध करत नाहीत. काही कंपन्या तर महाराष्ट्र, कर्नाटकात भरती मेळावे घेतात. गोव्यातील उद्योगांमध्ये असलेल्या नोकऱ्यांची माहिती गोव्यातील तरुणांना मिळेल यासाठी तशी सक्ती उद्योगांना करणे शक्य आहे. तुम्ही खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या गोवेकरांना मिळाव्यात म्हणून कायदा करू शकत नसला तरी सर्वांना कळेल अशा पद्धतीने नोकऱ्यांची जाहिरात करू शकता. इथे येणाऱ्या कंपन्यांना सरकार सवलती देत असते त्यामुळे त्यांना गोवेकरांना नोकरीत प्राधान्य द्या, असे सांगण्यासाठी सरकारने कचरू नये. सोबतच किती बेरोजगारांनी रोजगार विनिमय केंद्रात नोंदणी केली, कितीजणांना रोजगार मिळाला त्याची माहिती वेळोवेळी प्रसिद्ध व्हायला हवी. गोव्यातील तरुण आळशी नाहीत. ते आळशी असते तर जहाजांवर, आखाती देशांमध्ये, युरोपीयन देशांमध्ये, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सारख्या भागांत गोव्यातील तरुण कामासाठी गेलेच नसते. त्यांना इथे सुरक्षित नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून ते सातासमुद्रापार नोकऱ्यांसाठी जातात. त्यामुळे गोव्यातील तरुणांना आळशी म्हणणे योग्य होणार नाही. आळशी आणि सुशेगाद यात फरक आहे. ‘गोंयकार’ सुशेगाद असेल पण निश्चितच आळशी नाही.