कालावधी की गुणवत्ता महत्त्वाची?

काम आणि जीवन यांचे संतुलन ऐच्छिक नसून आवश्यक आहे. मेहनत हा यशाचा कणा आहे, पण तो तासांवर अवलंबून नाही. त्या तासांमध्ये आणलेल्या गुणवत्तेबद्दल आणि उत्कटतेबद्दल आहे.

Story: संपादकीय |
12th January, 09:41 pm
कालावधी की गुणवत्ता महत्त्वाची?

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांसाठी ७० तासांचा कामाचा आठवडा असायला हवा, असे निवेदन करून उद्योग क्षेत्रात खळबळ माजवली होती. रविवार सुटीचा दिवस धरला तर राहिलेले सहा दिवस प्रत्येकी १२ तास काम करणे शक्य आहे, असे सांगून त्यांनी आपण स्वतः कार्यालयात १४ तास काम करीत होतो, अशी पुष्टी जोडली होती. त्यावेळी जीवन आणि काम यांच्यात संतुलन असायला हवे, ही संकल्पनाच आपल्याला मान्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता वर्षभरानंतर लार्सन अॅन्ड टुब्रो या नामांकित कंपनीचे 

चेअरमन एस. एन. सुब्रह्मणम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील ९० तास काम करावे, असे सांगितल्याने ते सध्या टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. रविवारीही त्यांना काम करू न शकल्याची खंत वाटते. ते विचारतात की, तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ पाहू शकता? चला, ऑफिसला जा आणि कामाला लागा. या त्यांच्या निवेदनावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतात. पत्नीचा अशा प्रकारे उल्लेख झालेला अनेक उद्योजकांना आवडलेला नाही. काहींनी याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली आहे. 

आपण कर्मचाऱ्यांना रविवारी काम करायला भाग पाडू शकत नाही, याची खंत वाटते असे सांगून स्पर्धेला तोंड द्यायचे असेल तर रविवारीही काम करता आले तर मला समाधान वाटेल, असे सुब्रह्मण्यम म्हणतात. एल अँड टीच्या अध्यक्षांच्या या वक्तव्यावर अनेक उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, अशा कार्यसंस्कृतीचा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. काम आणि जीवन यांचा समतोल ऐच्छिक नसून आवश्यक आहे. आयुष्याचा सारा वेळ काम काम करणे आपल्याला अमान्य असल्याचे नामवंत उद्योगपती हर्ष गोएंका म्हणतात. कठोर आणि कौशल्याने काम करणे यावर आपला विश्वास आहे. कामगार म्हणजे गुलाम नव्हेत असे मत ते मांडतात. भारतीय उद्योग जगताने कामाचे तास मोजण्यापासून दूर जाण्याची गरज आहे, कारण हा 'पुरातन आणि प्रतिगामी' मापदंड आहे. पुरेसे तास घालविणे महत्त्वाचे असले तरी तासांची गुणवत्ताही महत्त्वाची आहे. तास वाढवणे वरपासून सुरू होऊ द्या, आणि जर असे आढळले की ते व्यवहार्य आहे, योग्य कार्य करते, तर ते आणखी खाली अंमलात आणता येईल, असे उद्योगपती राजीव बजाज यांना वाटते. मेहनत हा यशाचा कणा आहे, पण तो तासाभराचा नाही. त्या तासांमध्ये आणलेल्या गुणवत्तेबद्दल आणि उत्कटतेबद्दल आहे. जेव्हा तरुण व्यावसायिक उत्कट असतात आणि त्यांच्या कामात हेतू दिसतात, तेव्हा 'संतुलन' करण्याची गरज वैयक्तिक आणि व्यावसायिक परिपूर्णतेचे सुसंवादी मिश्रण बनते.

 आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या २०२३ च्या कामाची वेळ आणि कार्य-जीवन संतुलनावरील अहवालानुसार, महामारीच्या आधी २०१९ मध्ये जगभरातील सुमारे एक तृतीयांश कर्मचारी आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काम करत होते. या अहवालात स्त्री-पुरुष असमानताही अधोरेखित करण्यात आली असून, महिलांना कामाच्या दीर्घ तासांचा मोठा बोजा सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने या बाबींची दखल घेऊन कामाच्या तासांबाबतच्या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना सुरू करणे आवश्यक आहे आणि कामगारांना आठवड्याला ४८ तासांच्या कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त काम करण्याची सक्ती होऊ नये यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे, असे कामगार नेत्यांना वाटते. उपलब्ध माहितीनुसार, जगातील दहा मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीयांची सरासरी कामाची वेळ सर्वात जास्त आहे. केवळ कतार, कांगो, लेसोथो, भूतान, गांबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये कामाच्या सरासरी तासांपेक्षा वेळ जास्त आहे. भारत जगात सातव्या क्रमांकावर येतो. भारतात मोठ्या संघर्षानंतर आठ तासांचा कामाचा दिवस साध्य झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत कामगार सदस्य म्हणून मांडलेल्या विधेयकाचा परिणाम म्हणून १९४६ च्या कारखाना कायद्यातील दुरुस्तीमुळे भारताला ८ तासांचा कामकाजाचा दिवस मिळाला आहे. त्यात बदल करणे अनावश्यक असून, वाढती बेरोजगारी पाहता, नव्या संधी उपलब्ध करून देत युवावर्गाला रोजगार मिळवून देण्यानेच देश प्रगतीपथावर जाऊ शकेल.  जास्त तास काम केल्याने उत्पादकता वाढतेच असे नाही, प्रत्यक्षात उत्पादकता कमी होते. कामाच्या दीर्घ तासांचा एक गंभीर परिणाम कामगारांच्या आरोग्यावर होतो, हेही लक्षात घ्यावे लागेल.