खड्ड्याच्या दोन्ही बाजूला फलक नसल्याने रस्ता वाहतूकीसाठी बनलाय धोकादायक
फोंडा: टॉप कोला-बोरी येथील रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिन्या घालण्यासाठी खोदलेले खड्डे सध्या धोकादायक स्थितीत आहे. गेल्या काही दिवसापासून खोदलेल्या खड्ड्याजवळ फलक लावण्यात आले नसल्याने अपघात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पंधरा दराने त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी वाहन चालक करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार गेल्या काही दिवसापूर्वी गॅस वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदलेले दोन खड्डे वाहतुकीला धोकादायक बनले आहे. खड्ड्याच्या दोन्ही बाजूला फलक नसल्याने वाहने खड्ड्यात कोसळण्याचा धोका अधिक आहे.
फोंडा- मडगांव मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने खड्ड्याचा त्रास सर्व वाहन चालकांना होत आहे. त्याच ठिकाणी पेट्रोल पंप असल्याने अनेक वाहने ये - जा करीत असतात. पेट्रोल पंपवरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना खड्ड्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गॅस वाहिन्या घालण्याचे काम त्वरित पूर्ण करून खोदलेले खड्डे बुजवण्याची मागणी वाहन चालक करत आहे.
यापूर्वी परिसरात अनेक अपघात घडले असून काही जणांना जीव गमावावा लागला आहे. खड्ड्यामुळे अपघात रोखण्यासाठी गॅस वाहिन्या घालणाऱ्या कंत्राटदाराने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.