आजही अनमोड, पाळोळे, चंद्रनाथ येथे लाखो वर्षांच्या भूगर्भशास्त्राच्या इतिहासाची साक्ष देणारे शिलाखंड गोव्याच्या भूमीत पहायला मिळतात. कधीकाळी इथल्या पश्चिम घाट माथ्यावर सागराचे पाणी पसरले होते, त्याची प्रचिती इथल्या चुनखडीच्या शिलाखंडातून मिळते.
आज एका बाजूला महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटक अशा दोन मोठ्या राज्यांच्या कुशीत वसलेली गोव्याची भूमी १९८७ पासून भारतीय गणराज्यात स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलेले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, तेथून उगम पावणाऱ्या नद्या, नाले, ओहळ आणि पश्चिम किनारपट्टीवरचा अरबी सागर यांनी गोव्याच्या भौगोलिक आकाराला पूर्णत्व प्रदान केलेले आहे. नदीनाल्यांच्या जाळ्यांमुळे मोसमी मॉन्सूनचा पाऊस इथल्या भूप्रदेशातील पेयजलाची आणि जलसिंचनाची गरज भागवण्याबरोबर भूजलाला समृद्ध करण्यास सहाय्य करत असतो. आज केवळ भारतीय गणराज्यातच नव्हे तर जागतिक स्तरावर गोव्याची इथल्या पर्यटन व्यवसायामुळे ओळख निर्माण आलेली असली तरी प्राचीन काळापासून इथल्या बंदरांमुळे आणि विविध नद्या आणि खाड्यांनी युक्त जलमार्गांमुळे देश विदेशातील यात्रेकरू, व्यापारी आदींना या भूमीची ओळख झाली होती. मसाल्याच्या शोधार्थ आलेल्या युरोपियनांनी आपल्या साम्राज्याची भारतातील पहिली मुहूर्तमेढ सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात गोव्यातील तिसवाडी महालात रोवली आणि त्या काळी जलमार्गांद्वारे जोडलेल्या या प्रदेशात त्यांनी पूर्वेकडच्या जिंकून घेतलेल्या वसाहतींची राजधानी स्थापन केली.
आज पेडणे ते काणकोणपर्यंत विखुरलेल्या गोवा राज्याची सीमा पूर्वीच्या काळी बरीच मोठी विस्तारलेली होती. गोव्याची आणि कोकणची भूमी परशुरामाने बाण मारून सागराच्या पाण्याला हटवून निर्मिती केल्याची कथा सांगितली जाते. परंतु ही भूमी परशुरामाच्या आगमनापूर्वी अस्तित्वात होती, याचे भूगर्भशास्त्रीय, पुरातत्वीय आणि ऐतिहासिक पुरावे आज संशोधनाद्वारे उपलब्ध झालेले आहेत. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर कॅब्रियन पूर्व काळात पृथ्वीचे बाह्य कवच घट्ट होत गेले, त्या काळात पृथ्वीतलावर कायम एकच रूप धारण करणारा खडक नव्हता. त्यानंतरच्या कॅब्रियन काळात वादळवारे व समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमुळे पश्चिम भागाची धूप चालू होती आणि त्यातूनच गोव्यासह त्याच्याशी संलग्न अशा पश्चिम किनारपट्टीची निर्मिती झाली. ज्वालामुखीतून उसळलेल्या लाव्हारसामुळे टेकड्यांवर जांभ्या दगडाचा पातळ थर पसरला तर पश्चिमेकडे समुद्रापर्यंत हा थर पसरला. याच काळात वाहणाऱ्या जुवारी व मांडवी या नावांनी परिचित असलेल्या नद्यांच्या गाळामुळे निर्माण झालेल्या खोऱ्यात आणि कोट्यवधी वर्षांच्या समुद्राच्या लाटांनी, वादळवाऱ्यांनी वालुकामय भागात गोव्यातील शेती उदयाला आली. दक्षिण कोकणच्या साधारणपणे मध्यभागी गोव्याची भूमी वसलेली आहे आणि नदीनाले, खाड्या आणि अरबी सागरामुळे इथल्या जलमार्गाचा लाभ घेत मानवाचे समूह आदिम काळापासून या भूमीकडे येत राहिलेले आहेत ते विविध कारणांपायीच. इतिहासपूर्व काळापासून आदिमानवाचे आगमन मांडवी आणि जुवारी या नदी खोऱ्यात झाले होते, याची प्रचिती देणाऱ्या असंख्य खाणाखुणा, ऐतिहासिक पुरावे, पुरातत्वीय संचिते आढळत असतात, त्याच्यावरून या भूमीचे महत्त्व स्पष्ट होते.
आज नांगराच्या आधारे माणूस शेती करत असला तरी इतिहासपूर्व काळात इथल्या दऱ्याखोऱ्यांत वावरणारा आदिमानव सभोवतालच्या परिसरात मिळणारी कंदमुळे, फळे, फुले, पाने यांचे भक्षण करून तर कधी दगडी शस्त्रांच्या माध्यमाने जंगली श्वापदांची शिकार करून कच्चे मांस, रक्ताचा आस्वाद घेत पोटाची भूक शमविण्याचा प्रयत्न करत होता. नवाश्म युगात त्याच्या हातातील दगडी आयुधात परिवर्तन घडले आणि त्याची शस्त्रे अधिक धारदार, अणकुचीदार बनली आणि त्यामुळे शिकारीच्या तंत्रात सुधारणा होत गेली. पिकलेल्या फळांच्या बिया जमिनीत पडून, त्यातून रोप, झाड उगवताना निरिक्षण करणाऱ्या स्त्रियांना त्यांची लागवड करण्याची प्रेरणा आली आणि त्यातूनच शेतीचा उगम झाला. नांगराचा शोध लागण्यापूर्वी स्त्रिया टणकदार काठ्यांच्या माध्यमातून माती खणून, त्यात बिया पेरू लागल्या. डोंगर उतारावर नाचणी, वरी, कांगो, तूर, उडीद, कुळीथ यांची कुमेरी शेती करून, त्यांच्याकडे अतिरिक्त अन्नाचा साठा उपलब्ध झाल्याकारणाने त्याला कलाकौशल्याची प्रेरणा झाली. रात्रीच्यावेळी आकाशात लुकलुकणारे तारे, चंद्र आणि दिवसा दृष्टीस पडणारा सूर्य त्याला निरिक्षणाची संधी देऊ लागला. आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी साद घालणाऱ्या कोकिळ नर पक्ष्याच्या ध्वनीतून आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या किलबिलाटातून संगीताची निर्मिती लोकधर्मातील विधींसाठी करण्याची प्रेरणा त्यांना झाली.
नदी, नाले, ओहळ, झऱ्यांची खळखळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि विविध प्रकारच्या निसर्गातील ध्वनींनी मानवी समाजाचे लोकसंगीत समृद्ध केले. बांबूच्या वनात शीळ घालण्याची किमया करणारा वारा असो अथवा वादळवाऱ्याच्या झंझावातात झाडाच्या ढोलीतून निर्माण होणारा ध्वनी यातून मानवाला चर्मवाद्यांची, फुंकवाद्यांची प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे लोकसंगीताची निर्मिती त्याच्या जीवनाला अर्थपूर्ण करण्यास कारणीभूत ठरली. दऱ्याखोऱ्यांतून भणाणणारा वारा, पक्ष्यांचे कुंजन, पाण्याचा खळखळता प्रवाह, दर्याची गाज याद्वारे इथल्या निसर्गाच्या संगीताने मानवातील कलात्मकतेची अभिवृद्धी केली. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील या भूमीतील लोकमानसाला संगीताची उपजतच ओढ निर्माण झाली होती आणि त्यामुळे माडावर सूर काढण्यासाठी सरसर चढणाऱ्या रेंदेराला काताराच्या सुरावटीचा आणि शेताभाटात राबणाऱ्या इथल्या कष्टकऱ्याला भक्तीसंगीताची ओढ निर्माण झाली. तर महिलांना धालो, धिल्लो, गीती, कातयो गायनाची स्फूर्ती झाली होती. गोव्याला आकाशाला गवसणी घालण्यास सिद्ध झालेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा लाभलेल्या आहेत तसेच विस्तीर्ण जांभ्या दगडांनी युक्त पठारे रानफुलांनी, तृणपात्यांनी समृद्ध होती. नदी-सागराच्या किनाऱ्यावर वावरताना त्यांच्या जगण्याला इथल्या निसर्ग आणि पर्यावरणाने नाद, ताल, लय प्रदान केलेली आहे.
८०० मीटर उंचीपेक्षा सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेला सत्तरीतील सुर्ल गाव अथवा चोहोबाजूंनी सागराच्या पाण्याने वेढलेले अंजदीवचे बेट असो किंवा महाराष्ट्रातल्या रेडीशी संलग्न असलेले तेरेखोल गाव असो, गोव्याच्या भूमीने इथल्या माणसाच्या जगण्याला तृप्ती प्रदान केली आणि त्यामुळे मातीतील कष्टकऱ्यांना वारेमाप धनदौलतीची प्राप्ती करण्यासाठी अहोरात्र संघर्ष करण्याची वृत्ती निर्माण झाली नाही. आसाम, बंगाल प्रांतातून स्थलांतरित झालेल्या लोकसमूहाने तांदळासाठी भाताची पैदासी करण्यापूर्वी इथल्या नवाश्म युगात वावरणाऱ्या मानवी समूहाने भरड धान्यापासून पोषक तत्वे साध्य केली. जंगलातील श्वापदांचे मांस, नदी, खाडी, सागरातले मासे, मोसमी फळे, फुले, पाने यांचा आस्वाद घेत आपले जगणे समृद्ध केले. भरती - ओहोटीद्वारे घुसणाऱ्या सागराच्या पाण्याला नियंत्रित करता यावे यासाठी चिखलाचे बांध घालून, त्यावर माडाची लागवड करणाऱ्या आदिम जमातींनी ‘मानस’ची निर्मिती करण्याचे कौशल्य आणि तंत्र मांडले, त्याची प्रचिती किनारपट्टीवरील गावांत दृष्टीस पडते. आजही अनमोड, पाळोळे, चंद्रनाथ येथे लाखो वर्षांच्या भूगर्भशास्त्राच्या इतिहासाची साक्ष देणारे शिलाखंड गोव्याच्या भूमीत पहायला मिळतात. कधीकाळी इथल्या पश्चिम घाट माथ्यावरच्या प्रदेशात सागराचे पाणी पसरले होते, त्याची प्रचिती इथल्या चुनखडीच्या शिलाखंडातून मिळते हे या भूमीच्या गतवैभवाचे मानदंड आहेत.
- प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५