शुद्ध मनाचे, शुद्ध बुद्धीचे, निंदा न करणारे व एकनिष्ठ असे जे सज्जन असतात त्यांना गूढ, गौप्य, गुह्य गोष्टी विश्वासाने सांगाव्यात. असे केल्याने त्या सांगण्याचा सदुपयोग होतो.
त द्वतच सगळ्या सुखांचा विश्राम असा मी 'राम' अंतरात असूनही मति-मंद लोक त्यांच्या मतिमंदत्वाच्या योगाने मला न जाणता विषयांच्या ठायी भुलून जातात! मागील लेखांत आपण नवव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाच्या विवेचनाच्या अर्ध्यापर्यंत आलो होतो. "शुद्ध मनाचे, शुद्ध बुद्धीचे, निंदा न करणारे व एकनिष्ठ असे जे सज्जन असतात त्यांना गूढ, गौप्य, गुह्य गोष्टी विश्वासाने सांगाव्यात. असे केल्याने त्या सांगण्याचा सदुपयोग होतो," असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते. ते पुढे म्हणतात, आणि आता अर्जुना, या गुणांनी संपन्न असा माझ्या बघण्यात तरी तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून हे गूढ ज्ञान तुझ्यापासून लपवून ठेवू नये, असे मला वाटते. गूढ गूढ म्हणून त्याची वाखाणणी करून काही तुला ते समजेल असे नाही.
आता तेच चिरंतन सत्य मी तुला विश्वरचनेच्या ज्ञानासहित सोपे करून सांगेन. खरी व खोटी नाणी मिसळलेली असली की जसे खरे नाणे त्यातून पारखून काढावे लागते; किंवा जसे हंस चोंचीच्या चिमट्याने पाण्यात मिसळलेले दूध वेगळे करतो तसे अर्जुना, तुला मी आता ज्ञान आणि विज्ञान वेगळे करून दाखवेन. वाहत्या वाऱ्याच्या धारेवर धान्याचे सूप नीट धरून ते वारवले किंवा पाखडले की जशी दाण्यांची रास खाली राहून फोलपटे उडून जातात, तसे प्रपंचाच्या गाठीला बांधला जाऊन प्रपंच हा आभास असल्याची जी जाण मुमुक्षूला होते ती जाणच त्याला मोक्षाच्या सिंहासनावर बसवते.
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्।।२।।
सरळ अर्थ : हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा व सर्व गुह्यांचाही राजा असल्यासारखे असे अतिशय पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष फलदायी व धर्मयुक्त आहे. इतकेच नव्हे, तर हे साधन आचरण्यास फार सोपे व अविनाशी आहे!
विस्तृत विवेचन : सर्व विद्यांमध्ये 'आचार्य' ही गुरुत्वाची सर्वश्रेष्ठ पदवी मिरवणारे हे ज्ञान सर्व गुह्यांमध्ये वरिष्ठ आहे व सर्व पवित्रांमध्ये श्रेष्ठ आहे. सर्वोत्तम असे ते धर्माचे मूळ धाम आहे. ते जन्म व मृत्यू यांचे भय शिल्लक राहू देत नाही.
या ज्ञानाचा उगम जरी काही प्रमाणात गुरूंच्या मुखकमलातून होताना दिसत असला, तरी प्रत्यक्षात पाहो जाता ते मुमुक्षूच्या हृदयातच स्वयंसिद्ध असे विराजमान असते!
गुरुकृपा झाल्यावर ते तिथे असल्याचा प्रत्यय आपोआप येतो. त्याचप्रमाणे सुखाची वाट चढत जाऊन त्या ज्ञानाची भेट घेता येते. तशी ती भेट झाली की मग भोग्य, भोक्ता व भोग हे तिन्ही एक होऊन जातात! एवढेच नव्हे, तर मुमुक्षूचे चित्त त्या भोगाच्या ऐलसीमेवर जरी उभे असले तरी ते सुख पावते! इतके सुलभ आणि सुगम असूनही वरून ते ज्ञान मुमुक्षूला परब्रह्म-पद बहाल करते. या ज्ञानाची आणखी एक थोरवी अशी आहे की एकदा का ते हाती आले की ते आपल्या हातीच राहते. निघून जात नाही! त्याचा कितीही अनुभव घेतला तरी ते कमी होत नाही. कोणताही विकार न बाधणारे असे ते नित्य नूतन असते!
श्रीकृष्ण सांगत होते. धनुर्धर पार्थ लक्ष देऊन ऐकत होता. ते ऐकताना त्याच्या मनात साहजिकच असा विचार आला की, इतके भारी हे ज्ञान असताना आत्तापर्यंत सर्वसामान्यांपासून ते इतके लांब कसे काय राहिले? व्याजावर व्याज मिळवण्यासाठी जळत्या आगीमध्येही उडी मारायला तयार असणारे हे लोभिष्ट लोक इतक्या सहजपणे हाती येऊ शकणारे पवित्र रम्य, सहजगत्या गम्य (मिळू शकणारे) आणि सर्वश्रेष्ठ धर्म्य (म्हणजे शास्त्रोक्त, शास्त्राला धरून, शास्त्राला अनुसरून) व पावन असे अवीट, शाश्वत, सर्वोत्तम असलेले व आपल्याच ठायी विद्यमान असलेले हे आत्म-सुख अटीतटीने प्राप्त करायचा प्रयत्न केल्यावाचून कसे राहतील? अर्जुनाच्या चेहऱ्यावर ओसंडणाऱ्या भावांवरून मनकवड्या श्रीकृष्णांच्या ते लगेच लक्षात आले! ते म्हणाले हे पार्था, तुझ्या मनात उत्पन्न होत असणारी शंका बरोबर व रास्त आहे. पण जरा थांब.
अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि।।३।।
सरळ अर्थ : आणि हे परंतपा, या तत्वज्ञानरूप धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसारचक्रामध्येच भ्रमण करीत असतात.
विस्तृत विवेचन : त्वचेच्या पडद्याच्या आड जवळच शुद्ध व गोड असे दूध असते खरे, पण तो गोचीड त्याचा अव्हेर करून रक्तच पिऊन राहतो! कमळकंद तळ्यात असतो व बेडूकही तिथेच राहतो. पण त्या कमळकेसरातील अमृताचा स्वाद भ्रमरासीच ठावा व बेडकाने फक्त कर्दमकीटकच सेवावा! एखाद्याच्या घरी जमिनीतच धनाने भरलेले हंडे असतात, पण दैवहीनतेने ते त्याला माहीत नसल्यामुळे तो तिथेच बसून उपाशी राहून दैन्यवाणे जीवन जगत असतो! तद्वतच सगळ्या सुखांचा विश्राम असा मी 'राम' अंतरांत असूनही मति-मंद लोक त्यांच्या मतिमंदत्वाच्या योगाने मला न जाणता विषयांच्या ठायी भुलून जातात! बरंचसे मृगजळ पाहून तोंडात घेतलेली अमृताची चूळ थुंकून टाकावी किंवा गळ्यात बांधलेला परीस फालतु शिंपला आहे म्हणून तोडून टाकावा त्याप्रमाणे अहंममत्वाला (म्हणजे मीपणा आणि माझेपणा यांना) वेंगाटून (म्हणजे घट्ट कवटाळून) बसलेले अभागी (लोक) माझ्या प्राप्तीला वंचित होऊन जन्म आणि मृत्यूच्या दोन तटांमध्ये वारंवार गटांगळ्या खात राहतात. एरवी जसा डोळ्यांसमोर सूर्य असावा तसा मी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर असतो आणि वरून "त्याच्या उदय-अस्तामुळे रात्र व दिवस होणे" या उणिवाही माझ्यामध्ये नाहीत. (तरीही मतिमंदत्वायोगे ते त्यांच्या ध्यानी मनी येत नाही!). इथे तिसऱ्या श्लोकाचं विवेचन पूर्ण झाले.
आपण वाचकांनी, गीतेच्या अभ्यासकांनी इथे लक्षात हे घ्यायचे आहे की भगवद्गीता हा श्री व्यास निर्मित महाभारताचा एक लहानसा भाग आहे. "जय" नावाच्या इतिहासाचे तपशीलवार वर्णन जेव्हा इतर उपलब्ध ग्रंथांबरोबर भावार्थाने तोलले गेले तेव्हा लक्षात आले की हा ग्रंथ सर्व दृष्टींनी मानवासाठी इतर सर्व ग्रथांपेक्षा कितीतरी उजवा आहे. म्हणून त्याला "महाभारत" अशी संज्ञा देण्यात आली. या ग्रंथात योग्य दिशेने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांवर सगळ्यात जास्त भर देण्यात आलेला आहे. तोच कर्मयोग! आणि हेच लोकमान्यांचे गीतारहस्य!
- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३