सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या समर्थकांत विविध कारणांमुळे मतभेद आहेत. गेल्या काही दिवसांत पक्षांतर्गत हे वाद आणि नेत्यांमधील दुफळी दिसून आली आहे. भाजप या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.
ममता बॅनर्जी यांच्यानंतर अभिषेक यांचे स्थान आहे. मात्र, अभिषेक यांचे पक्षातील काही नेत्यांबरोबर मतभेद आहेत. या दोघांतील मतभेद यापूर्वी अनेक वेळा दिसून आले आहेत. कोलकाता येथील आरजी कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरण टीएमसी सरकारने ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. या मुद्द्यावरून अभिषेक यांचे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांबरोबर मतभेद आहेत. यातच ममता यांनी अभिषेक यांच्या निकटवर्ती मंत्र्यांवर केलेल्या टीकेमुळे हे मतभेद पुन्हा समोर आले आहेत. गायिका लाग्नजिता यांच्याबरोबरच डेबलिना दत्ता यांनी देखील आरजी कार आंदोलनात सरकारविरोधात भूमिका घेतली होती. यावेळी त्यांना ममतांच्या रोषास सामोरे जावे लागले होते.
नववर्ष स्वागतासाठी आयोजित गायिका लग्नजिता यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. यानंतर पक्षाचे वरिष्ठ प्रवक्ते कुणाल घोष यांनी केलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री, सरकारवर टीका करणारे कलाकार तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमातील मंचावर दिसू नयेत. त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, असे म्हटले होते. त्यानंतर गायिका लग्नजिता यांचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले.
अभिषेक यांनी या मुद्द्यावरून कुणाल घोष यांच्यावर निशाणा साधला होता, तसेच आरजी रुग्णालय प्रकरणात देखील अभिषेक यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र, ज्येष्ठ टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी घोष यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षातील नेत्यांमधील हे वाद चव्हाट्यावर आले होते. तृणमूलमधील वादाचा भाजपने आपल्याला फायदा करून घेतल्याचे दिसून आले.
या तणावाचे मूळ हे पक्षातील संघटनात्मक फेरबदलांना झालेला उशीर असल्याचे टीएमसीमधील काही नेत्यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत तृणमूलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. याला जिल्ह्यांचे अध्यक्ष जबाबदार असल्याची भूमिका अभिषेक यांनी घेतली होती. त्यांना हटवून त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची निवड लवकर करावी, असा प्रयत्न अभिषेक यांनी चालवला आहे. तर, ममता यांनी अजून यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यांच्यातील वादाचे हेही एक कारण आहे.
- प्रसन्ना कोचरेकर