नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने एफसी गोवाला बरोबरीत रोखले

यजमानांचा सलग तिसरा ड्रॉ : आघाडी घेऊनही गौर्सने संधी गमावली

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
14th January, 10:08 pm
नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने एफसी गोवाला बरोबरीत रोखले

गुवाहाटी : इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) साखळी सामन्यात घरच्या मैदानावर पिछाडी भरून काढताना नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने एफसी गोवाला १-१ असे बरोबरीत रोखले. यजमानांचा यंदाच्या हंगामातील हा सलग तिसरा तर पाहुण्यांचा सलग दुसरा ड्रॉ आहे.

यजमानांपेक्षा सहा टक्के अधिक चेंडूवर नियंत्रण ठेवण्यासह अचूक पासिंग (७१ टक्के) करण्यात एफसी गोवाने नॉर्थ ईस्ट एफसीवर वर्चस्व राखले. सर्वाधिक पासेसही त्यांचेच आहेत. सर्वाधिक पेनल्टी कॉर्नर (५-३) ही यजमानांसाठी जमेची बाजू ठरली. मात्र, पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले.

दोन्ही टीमच्या प्रभावी आक्रमण आणि अचूक बचावामुळे मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. मात्र, उत्तरार्धात उभय संघांनी डावपेच बदलले. त्याचा सकारात्मक परिणाम ६५व्या मिनिटाला एफसी गोवाकडून पाहायला मिळाला. ब्रिसन फर्नांडिसच्या सुरेख पासवर मोहम्मद यासिरने यजमानांची बचावफळी भेदली. गोलखाते उघडले गेल्याने एफसी गोवाचा आत्मविश्वास उंचावला. मात्र, यजमानांची आक्रमण फळीही सतर्क झाली. त्यांनी आक्रमण अधिक प्रभावी केले. ७२व्या मिनिटाला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळवत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या बचावफळीवर दडपण आणले. त्यानंतर ७६व्या मिनिटाला जिथिन मदथील सुब्रनने अलाईद्दीन अजरालेच्या पासवर नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

गोवाची १५ सामन्यांतील सलग दुसरी बरोबरी

  • १) उर्वरित १४ मिनिटांमध्ये दोन्ही संघांनी आघाडीसह निर्णायक विजयासाठी प्रयत्न केले तरी त्यात त्यांना अपयश आले. एफसी गोवाची १५ सामन्यांतील सलग दुसरी आणि एकूूण सहावी बरोबरी आहे.
  • २) कालच्या एका गुणासह त्यांनी गुणसंख्या २७वर नेत गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी झेप घेतली. बंगळुरू एफसीचे १५ सामन्यांतून तितकेच गुण आहेत. मात्र, गोलफरकाच्या आधारे गौर्सनी पॉइंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली.
  • ३) नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीला १६ सामन्यांतून सहाव्यांदा बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यांनी ड्रॉची हॅटट्रिक साजरी केली. होमग्राउंडवरील बरोबरीनंतर त्यांच्या खात्यात २४ गुण असून गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहेत.

क्षणभर टिकला आघाडीचा आनंद

इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक स्टेडियमवर झालेल्या लढतीत मंगळवारी दोन्ही गोल उत्तरार्धात ११ मिनिटांच्या फरकाने झाले. ६५व्या मिनिटाला मोहम्मद यासिरने पाहुण्यांना आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांचा आघाडीचा आनंद फार काळ टिकला नाही. ७६व्या मिनिटाला जिथिन मदथील सुब्रनने यजमानांना बरोबरी गाठून दिली.

सामन्याचा निकाल

नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी १ (जिथिन मदथील सुब्रन, ७६व्या मिनिटाला) बरोबरी वि. एफसी गोवा १ (मोहम्मद यासिर, ६५व्या मिनिटाला).