निर्णय बदलणे योग्यच !

शेवटी पेपर तपासणीतील त्रुटींमुळेच विद्यार्थी गुणांच्या फेरतपासणीसाठी येत असतात, हेही शालान्त मंडळाने लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपल्या चुकांचा दंड विद्यार्थ्यांना देऊ नये.

Story: संपादकीय |
13th January, 10:25 pm
निर्णय बदलणे योग्यच !

दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिकांची विद्यार्थ्यांना फेरतपासणी करायची असल्यास प्रश्नामागे शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय गोवा शालान्त मंडळाने घेतला होता. त्या निर्णयामुळे गेले दोन दिवस शालान्त मंडळावर टीकाही सुरू झाली. हा निर्णय मंडळाच्या कार्यकारी समितीने घेतला होता. या निर्णयामुळे गोवा शालान्त मंडळावर टीका झाली असली तरी मंडळाने घेतलेला हा निर्णय मंडळाचा वेळ वाचवण्यासह महसुलातही वाढ करण्यासाठी फायद्याचा ठरणार होता. दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालानंतर शेकडो विद्यार्थी उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी अर्ज करत असतात. असे आढळून आले आहे की, गुणांच्या फेरतपासणीसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक चार विद्यार्थ्यांमागे एका विद्यार्थ्याचे गुण बदलतात. ज्यांना आपल्या गुणांविषयी शंका असते असे विद्यार्थी फेरतपासणीसाठी अर्ज करत असतात. पेपर तपासणीत त्रुटी राहत असल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना फेरतपासणीनंतर आपले गुण वाढल्याचे दिसून येते. त्यामुळेच गुणांचे फेरमूल्यांकन मागणाऱ्यांची संख्याही गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. २०१९ मध्ये दहावीच्या १,९३६ विद्यार्थ्यांनी पेपर फेरतपासणीसाठी अर्ज केले, त्यातील ५१३ विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणात बदल सापडले. त्याचवर्षी बारावीच्या १,६९४ विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले, त्यातील ५१४ विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांमध्ये बदल दिसले. ही आकडेवारी पाहिली तर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सरासरी ३० टक्के विद्यार्थ्यांना आपल्या पेपरच्या गुणांमध्ये बदल दिसले. जर हीच बाब सर्व विद्यार्थ्यांना लागू केली तर हा आकडा ५ हजारांच्या आसपास जाऊ शकतो. म्हणजे परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये फरक दिसू शकतो. कारण सर्वांची पेपर तपासणीची पद्धत तीच असते. तपासणारेही तेच असतात. गेल्या काही वर्षांमध्ये गोवा शालान्त मंडळाच्या कार्यपद्धतीत प्रचंड बदल झाले आहेत. अनेक नवे चांगले बदल बोर्डाने केले आहेत. त्याचे श्रेय गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांना द्यायला हवे. ठोकळेबाज चौकटीतून बाहेर पडत शालान्त मंडळाला आधुनिकीकरणाची जोड शेट्ये यांनी दिली. अभ्यासक्रमांमध्ये बदल, नवी इमारत, शिक्षकांना प्रशिक्षण, ऑनलाईन व्यवहार अशा अनेक गोष्टी गोवा बोर्डाने मार्गी लावल्या. कोविडच्या काळात परीक्षा न घेण्यावरून निर्माण झालेली स्थिती असो किंवा त्यानंतर वर्षाला दोनदा परीक्षा घेण्यासाठी केलेली कसरत असो, हे बदल स्वीकारून शालान्त मंडळाने यशस्वीपणे परीक्षा पद्धतीत सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न केले. अभ्यासक्रमांपासून ते शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासह अनेक अभिनव उपक्रम शालान्त मंडळाने राबवले आहेत. त्यामुळे परीक्षेच्या फेरमूल्यांकनासाठी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यामागे मंडळाला आर्थिक बळकटी देण्याचा विचार होता, हेही मान्य करायला हवे. हा निर्णय मंडळाने फिरवला, त्यामुळे आता जुनेच शुल्क लागू राहील. शालान्त मंडळाने पेपर मूल्यांकनासाठी असलेल्या शिक्षकांना चांगले प्रशिक्षित करणे, अशा चुका त्रुटी राहू नयेत यासाठी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. पेपर तपासणीसाठी आधुनिक पद्धत अवलंबता येईल का, त्याकडे गोवा शालान्त मंडळाने लक्ष द्यायला हवे. कारण उत्तरपत्रिका तपासणीत मोठ्या प्रमाणात त्रुटी राहत असतील आणि विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत असेल तर गोवा शालान्त मंडळात होणाऱ्या सुधारणांना काही अर्थ राहणार नाही.

आतापर्यंत उत्तरपत्रिकेची फोटो प्रत मिळवण्यासाठी ३५० रुपये शुल्क होते. पूर्ण उत्तरपत्रिकेच्या फेरमूल्यांकनासाठी प्रती विषय ७५० रुपये तर गुणांच्या फेरतपासणीसाठी विषयासाठी १०० रुपये शुल्क आहे. त्यात बदल करून शालान्त मंडळाने आता फोटो कॉपी मागितल्यानंतर विद्यार्थ्याला कुठल्या प्रश्नांबाबत शंका आहे, त्यातील प्रत्येक उत्तराच्या फेरमूल्यांकनामागे १०० रुपये शुल्क आकारले जाईल, असा निर्णय घेतला होता. निकालानंतर मोठ्या प्रमाणात पेपर तपासणीच्या मागण्या येतात, त्यामुळे त्यात घट व्हावी असाही एक हेतू यामागे असण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थ्यांना ही रक्कम परवडणारी नाही, त्यामुळे त्या गोष्टींचा विचार शालान्त मंडळाने करायला हवा असा सूर लोकांमधून व्यक्त झाल्यानंतर मंडळाने विद्यार्थ्याच्या आर्थिक क्षमतेचा विचार करून निर्णय मागे घेतला. सरसकट सर्वांसाठी असे शुल्क लागू करणे म्हणजे विद्यार्थ्यांना पेपर फेरमूल्यांकनापासून रोखणे, असा त्याचा अर्थ होणार होता. शालान्त मंडळाने पेपर तपासणी त्रुटीविरहित व्हावी यासाठी आधी उपाय करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांवर शुल्काचे ओझे टाकण्यापेक्षा पेपर तपासणीत त्रुटी कमी राहतील यासाठी पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना चांगले प्रशिक्षित करावे. शेवटी पेपर तपासणीतील त्रुटींमुळेच विद्यार्थी गुणांच्या फेरतपासणीसाठी येत असतात, हेही शालान्त मंडळाने लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे आपल्या चुकांचा दंड विद्यार्थ्यांना देऊ नये. शुल्कवाढ करायचीच असेल तर सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ही शुल्कवाढ परवडणार आहे का, त्याचाही विचार व्हायला हवा. शुल्कवाढीपेक्षा गोवा शालान्त मंडळाची विश्वासार्हता जास्त महत्त्वाची आहे.