१७ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली होती घटना
फोंडा: माशेल ते सांतईस्तेव्ह येथील पुलावर चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी प्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेला राजेश गोपीनाथ मापारी (३७, पोबूर्पा) याला फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
संशयिताला ४८ दिवसांची न्यायालयीन कोठडी व ५०० रुपयांचा दंड भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर एका महिन्यात न्यायालयाने निकाल दिला आहे. म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोशन मार्टिन यांनी याप्रकरणी तपास केला होता.
दि. १७ नोव्हेंबर रोजी रस्त्यावरून चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले होते. म्हार्दोळ पोलिसांनी तपास करून या प्रकरणी राजेश गोपीनाथ मापारी याला अटक करून गुन्ह्यात वापरलेली जीए - ०७- एजे-५०४८ क्रमांकाची स्कूटर जप्त केली होती.
दि. १२ डिसेंबर रोजी संशयिताविरुद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर अवघ्या एका महिन्यात न्यायालयाने आदेश देताना संशयिताला दोषी ठरविले आहे.