सांडपाणी नाल्यात सोडल्याप्रकरणी कारवाई : उर्वरित आस्थापनेही रडारवर
मडगाव : सांडपाणी थेट नाल्यात सोडल्याप्रकरणी नोटीसा देऊनही ते बंद न करणार्या ४६ आस्थापनांना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने मडगावातील २१ आस्थापनांना सील केले. उर्वरित आस्थापनांवरही लवकरच कारवाई केली जाणार आहे.
नावेलीतील सायपे तलावासह साळ नदीचे प्रदूषण होत असल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी सुनावणीवेळी ज्या आस्थापनांनी सांडपाणी थेट नाल्यात सोडलेले होते त्यांना सांडपाणी जोडणी घेण्यासह सांडपाणी उघड्यावर न सोडण्याबाबत नोटीसा देण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर कार्यवाही न झाल्याने आता गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी पोलीस बंदोबस्तात आस्थापनांना टाळे ठोकण्याचे काम सोमवारपासून सुरू केले आहे. सोमवारी एकूण १६ दुकानांना तर मंगळवारी आणखी पाच दुकानांना सील करण्यात आले आहे. पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू ठेवत गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाल्यांमध्ये सांडपाणी सोडल्याबद्दल दुकानांना सील ठोकले आहे. बंद करण्यात आलेल्या दुकानांत रेस्टॉरंट व अन्य दुकानांचा समावेश आहे.
सासष्टीचे मामलेदार विमोद दलाल यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन केलेल्या मालकांना त्यांचे व्यवसाय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत किंवा पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल अशाही याआधी सूचना दिलेल्या होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली. यात असे आढळून आले आहे की मडगावमधील असंख्य हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, कचरा आणि स्वयंपाकघरातील सांडपाणी वाहत्या नाल्यांमध्ये सोडतात. त्यानंतर नोटीसा देऊनही उपाययोजना न केलेली मडगावातील एकूण ४६ आस्थापने बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मंगळवारी पाच दुकानांना टाळे
सोमवारपासून आस्थापने सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सोमवारी सायंकाळपर्यंत १६ आस्थापनांना टाळे ठोकण्यात आले. मंगळवारी दुपारपर्यंत त्यात आणखी पाच दुकानांची भर पडली.