नागरिकांत संताप : फोंडा पोलिसांकडून गुन्हा दाखल
फोंडा : उसगाव पंचायतीच्या सचिवाने विनयभंग केल्याची तक्रार पीडित युवतीने पंचायत संचालक, फोंडा गटविकास अधिकारी व फोंडा पोलीस स्थानकात दाखल केली आहे. पंचायत कार्यालयात कंत्राटपद्धतीवर काम करणाऱ्या आपल्या मुलीच्या वयाच्या युवतीचा सचिवाने विनयभंग केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पीडित युवती वाळपई मतदारसंघातील, तर संशयित सचिव साखळी मतदारसंघातील आहे. रात्री उशिरा फोंडा पोलिसांनी पंचायत सचिव होनाजी अनिल मोरजकर (साखळी) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे.
पंचायत क्षेत्रातील घराचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय पंचायत मंडळाने घेतला होता. त्यानुसार, पंचायत सचिवाने सहा मुलींना व एका युवकाला सर्वेक्षणासाठी कंत्राट पद्धतीवर कामावर घेतले होते. प्रत्येक कामगाराला पंधरा हजार रुपये पगार ठरला होता. धनादेशावर सरपंच व पंचायत सचिव सही करीत होता. पण धनादेशातील रक्कम काढून ९ हजार रुपये परत सचिव आपल्याकडे प्रत्येकाकडून घेत होता. तसेच पीडित युवती हुशार असल्याचे सांगून आपल्या कार्यालयात बसवून ठेवत होता. त्यानंतर हा सचिव अश्लील संदेश मोबाईलवरून तिला पाठवू लागला. एके दिवशी पंचायत संचालकाला भेटण्यासाठी पणजीमध्ये तो युवतीला घेऊन गेला होता. पण पंचायत संचालक म्हणून एका पुरुष अधिकाऱ्याशी चर्चा करून परत येत असताना युवतीचा विनयभंग केला. त्यामुळे भयभीत झालेल्या युवतीने गेले काही दिवस कामावर येणे बंद केले होते. पण मंगळवारी अचानक कामावर गेल्यानंतर आपल्या जागी अन्य एका युवतीला कामावर ठेवण्यात आल्याचे तिला आढळून आले. आपल्याप्रमाणे इतर युवतींना फसवू नये, या उद्देशाने पीडित युवतीने पोलीस तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी तपास करत आहेत.
ती डॉक्टर महिला कोण?
पीडित युवती साखळी येथील एका लायब्ररीमध्ये जात होती. त्यावेळी तिथे एका डॉक्टर महिलेशी तिची ओळख झाली. त्या डॉक्टर महिलेने पीडित युवतीला उसगाव येथील पंचायत कार्यालयात काम करण्याची ऑफर दिली. काम मिळणार म्हणून युवतीने होकार दिला आणि कामावर रुजू झाली. पण विनयभंगाचा प्रकार घडल्यानंतर त्या पीडित युवतीला फोन करून त्या जागी नवीन युवतीला कामावर रुजू करणार म्हणून सांगण्यात आले. त्यामुळे ती डॉक्टर महिला आणि पंचायत सचिव यांचा काही तरी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.