म्हापसा : येथील कदंब बस स्थानकाच्या मागच्या बाजूस म्हापसा पोलिसांनी छापा टाकून १.२० लाखांचा १.२०० किलोग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी संशयित आरोपी रुद्र नारायण जेना (२१, रा. ओडिशा) याला अटक केली.
ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा केली. बस स्थानकाच्या मागील बाजूस ड्रग्सचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. संशयित घटनास्थळी येताच त्यास पोलीस पथकाने पकडले व त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ १ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला.
हा गांजा पोलिसांनी जप्त केला व संशयित आरोपीला पोलीस स्थानकावर आणून ड्रग्स प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून त्यास रीतसर अटक केली.पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तप्रसाद पंडित, पंढरी चोपडेकर, आदित्य गाड, हवालदार सुशांत चोपडेकर, महेंद्र मांद्रेकर, प्रकाश पोळेकर, अक्षय पाटील, राजेश कांदोळकर व आनंद राठोड या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.