बार्देश : दुकानांचे करारपत्र, अवैध नोकरभरती नगराध्यक्षांच्या अंगलट

म्हापसा नगराध्यक्ष बिचोलकर होणार पायउतार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
बार्देश : दुकानांचे करारपत्र, अवैध नोकरभरती नगराध्यक्षांच्या अंगलट

म्हापसा : येथील अलंकार थिएटर परिसरातील म्हापसा पालिकेच्या मालकीची दोन दुकाने ही एकच असल्याचे भासवून त्यांचे बेकायदेशीररीत्या करारपत्र आपल्या पतीच्या नावे हस्तांतर करण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर यांनी केला होता. शिवाय अवैध पद्धतीने नोकर भरती केली होती. हे पालिका मंडळाची दिशाभूल आणि षड्यंत्र रचणारे मुद्देच त्यांना नगराध्यक्षपदावरून पायउतार करण्यास कारणीभूत ठरले आहेत, असा दावा सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी केला आहे.

८ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत अर्जदार दत्ताराम कृष्णा बिचोलकर यांच्या जुन्या मार्केटमधील (अलंकार थिएटर जवळील) दुकानाच्या करारपत्र हस्तांतराचा मुद्दा उपस्थित झाला. या दुकानांचे मूळ भाडेकरू कृष्णा दत्ताराम बिचोलकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मीना बिचोलकर यांनी दोन दुकानांपैकी दुकान क्रमांक २४ हे विराज कृष्णा बिचोलकर, तर दुकान क्रमांक २५ हे दत्ताराम कृष्णा बिचोलकर यांच्या नावावर हस्तांतरित केले होते. ही दुकाने करारपत्र हस्तांतरणाची कार्यवाही २००२ साली झाली होती. 

मात्र पालिका मुख्याधिकारी आणि इतर पालिका अधिकाऱ्यांच्या सहाय्याने या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आले आणि २४ व २५ ही दोन्ही दुकाने एकच असल्याचे भासवून नगराध्यक्षांचे पती असलेले दत्ताराम कृष्णा बिचोलकर यांच्या नावावर भाडेकरू करारपत्र हस्तांतरित करण्याचा डाव रचला गेला होता. मात्र हा बेकायदा प्रकार नगरसेवकांनी पालिका मंडळाच्या निदर्शनास आणून दिला होता. सरकारने भाडेकरू करारपत्र नूतनीकरण व रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्या नावावर दुकान हस्तांतराला बंदी घातलेली आहे. 

पालिका मंडळाने सहा कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेण्याचा ठराव घेतला होता. मात्र या ठरावाला नगरसेवक अॅड. शशांक नार्वेकर यांनी हरकत घेतली होती. शिवाय सदर पालिका मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत मंजुरीविना ही नोकरभरती केल्याचा दावा करत नगरसेवकांनी या विषयावरून नगराध्यक्षांना धारेवर धरले होते. तसेच ११ विरुद्ध ७ मतांनी हे इतिवृत्त फेटाळले होते. दरम्यान, याच दोन मुद्द्यांवरून म्हापसा पालिका मंडळाची बैठक तीन वेळा तहकूब करण्यात आली होती.

एककल्ली कारभारामुळे नाराजी

पालिका कारभार हाताळताना नगराध्यक्ष सत्ताधारी गटातील नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत. त्या फक्त पालिका मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार कारभार हाताळतात. बेकायदा गोष्टींना खतपाणी घालतात. यामुळे सत्ताधारी गटात असंतोष पसरला होता. यावर तोडगा म्हणून आमदार जोशुआ डिसोझा यांनी नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांना पदाचा राजीनामा देण्याची सूचना केली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

हेही वाचा