बदनामीविरोधी मोहीम, सिंगल विंडोला मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित गोवा पर्यटन मंडळाच्या बैठकीत चर्चा : पर्यटन आकर्षक करण्याचा प्रस्ताव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
बदनामीविरोधी मोहीम, सिंगल विंडोला मंजुरी

पणजी : सांस्कृतिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे, सोशल मीडियावरील बदनामीविरुद्ध मोहिमा सुरू करणे, तसेच व्यवसाय सुलभ करण्यासाठी सिंगल विंडो मंजुरी देण्याबाबत पाचव्या गोवा पर्यटन मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीत किनाऱ्यावरील समस्या संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ५वी गोवा पर्यटन मंडळाची बैठक झाली. याप्रसंगी पर्यटन मंत्री रोहन खंवटे, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर, सदस्य आणि पर्यटन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. गोव्यात पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी क्रूझ टर्मिनल्सच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी मंडळाने विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि क्रूझ टर्मिनल्सवरील टॅक्सी भाडे नियंत्रित करण्याचा तसेच प्रवाशांसाठी चांगली सेवा आणि सर्वसमावेशक दर लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच रेंट अ कार सेवांवर कडक निर्बंध लागू करण्याची सूचना दिल्याची माहिती मुख्यमं‌त्र्यांनी दिली.
एकादशी तीर्थासारख्या सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेणे, बदनामी विरोधात जागतिक मोहिमा सुरू करणे, परदेशी माध्यमांतील मार्केटिंग मोहिमा सुरू करण्यावर चर्चा झाली. तसेच बैठका, प्रचार, परिषद आणि प्रदर्शन पर्यटन आणि लग्न सोहळ्यांसाठी सिंगल विंडो डिस्प्ले यंत्रणा बसवून राज्यात अधिक पर्यटन आकर्षित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात अाल्याचेही त्यांनी सांगितले.
ही बैठक दर सहा महिन्यांनी होणे बंधनकारक आहे. परंतु ती प्रलंबित असल्याने मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सदर बैठक बोलावली, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. गोवा पर्यटन मंडळ हे संपूर्ण देशातील एकमेव मंडळ आहे. ज्यामध्ये ५० टक्के पर्यटन भागधारक आणि ५० टक्के पर्यटन खात्याचा समावेश आहे, जे धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. मंगळवारची बैठक ही सोमवारी झालेल्या भागधारकांच्या बैठकीचा पाठपुरावा होता जे मुद्दे भागधारकांनी मांडले ते आज उपस्थित झाल्याचे मंत्री खंवटे म्हणाले.

क्रूझ टर्मिनल्समध्ये वाय-फाय, स्वच्छता गृह, पदपथ, विश्रामगृहे, हॉटेल्स, प्रतीक्षालय, सुरक्षा तपासणीला गती देण्यासारख्या गोष्टींचा समावेश करून गोवा हे क्रूझ जहाजांसाठी ‘होम पोर्ट’ म्हणून ओळखले जाणार आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री


गोव्यात चांगले पर्यटन सुनिश्चित करण्यासाठी आम्ही येत्या काही दिवसांत एक स्पष्ट योजना विकसित करणार आहोत. या बैठकीचे इतिवृत्त प्रकाशित झाल्यानंतर सर्वांना सूचना पाठवल्या जातील आणि सर्व गोष्टी लवकरात लवकर सुरळीत होतील याची खात्री केली जाईल. रोहन खंवटे, पर्यटन मंत्री

हेही वाचा