पणजीत १७ ते २६ दरम्यान लोकोत्सवाचे आयोजन

मंत्री गोविंद गावडे : २० राज्यांतील विविध कलाकारांचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
पणजीत १७ ते २६ दरम्यान लोकोत्सवाचे आयोजन

पणजी : कला आणि संस्कृती खात्यातर्फे १७ ते २६ जानेवारी दरम्यान २४ व्या लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव पणजीतील कला अकादमी परिसरात सकाळी १० ते रात्री १० दरम्यान होणार असल्याची माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खात्याचे संचालक सगुण वेळीप, कला अकादमीचे सदस्य सचिव अरविंद खुटकर आदी उपस्थित होते.
गावडे यांनी सांगितले की, लोकोत्सवाचे उद्घाटन १७ जानेवारी रोजी सायं. ६ वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते होणार आहे. यंदाच्या लोकोत्सवात २० राज्यांचे ६०० लोक कलाकार, तर १००० हस्त कलाकार सहभागी होणार आहेत. शिवाय येथील ५५० स्टॉलवर हस्तकला आणि खाद्यपदार्थांची विक्री होणार आहे. तर दररोज सायं. ६ ते १० पर्यंत लोकनृत्यांचे कार्यक्रम होतील.
गोमंतकीय लोककलाकारांची २० पथके गणेश वंदना, घोडेमोडणी, जागोर, मुसळ, सगई, गोफ, देखणी, मांडो, कुणबी, तोणयामेळ, दांडलां खेळ, तालगडी, मोरुलो, विरभद्र आणि धनगर आदी लोकनृत्य सादर करतील. याशिवाय २० जानेवारीपासून पाच दिवसीय मोलेला (टेराकोटा कला) कार्यशाळा घेण्यात येणार आहे. तसेच महोत्सवात गोमंतकीय चित्रकारांच्या चित्रकला आणि शिल्पकलाकृतींचे प्रदर्शन होणार आहे.
देशभरातील लोकनृत्यांचा घेता येणार आस्वाद
यंदा राजस्थानची मांगणियारी गीते, कालबेलीया व चरी नृत्य, आसामचा बिहु, गुजरातचा गरबा, मेवासी, रास व सिद्धी धमाल, महाराष्ट्राचा पोवाडा व लावणी, पश्चिम बंगालचा पुरुलिया छांव, नाटुआ व रायबेन्से, कर्नाटकचा ढोलु कुनिथा, हरियाणाचा घुमर, जोडीशाचा गोटीपुआ, मणीपुरचा पुंग ढोल चोलम आणि उत्तर प्रदेशचा थेंढीया यांसारख्या देशभरातील विविध लोकनृत्यांचा आस्वाद रसिकांना घेता येईल, अशी माहिती मंत्री गावडे यांनी दिली.
चौकट
वाहतूक कोंडीबाबत तक्रार नाही
मंत्री गावडे यांनी सांगितले की, महोत्सवामुळे कांपाल परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याची कोणतीही तक्रार खात्याकडे आलेली नाही. अशी तक्रार आली तर त्यावर आम्ही विचार करू. परंतु, लोकोत्सव हा गोव्याचा ब्रँड उत्सव आहे हे देखील समजून घेतले पाहिजे.                               

हेही वाचा