पणजी, रायबंदर परिसरात १३ ठिकाणी खोदकाम!

रस्त्यांची स्थिती दर्शविणारे फोटो उच्च न्यायालयात सादर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
पणजी, रायबंदर परिसरात १३ ठिकाणी खोदकाम!

पणजी : रायबंदर आणि पणजी परिसरात १३ ठिकाणी खोदकाम सुरू आहे. या संदर्भात पणजी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी खोदलेल्या रस्त्यांची परिस्थिती दर्शविणारे फोटो अॅमिकस क्युरी अभिजित गोसावी यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवार १५ रोजी होणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच कामामुळे होणारे धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी न्यायालयात पियुष पांचाल, आॅल्विन डिसा, नीलम नावेलकर आणि ख्रिस्तस लोपीस व सदानंद वायंगणकर यांनी दोन वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या.

याची दखल घेऊन न्यायाधीशांनी पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यात प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपाययोजना लागू करण्यास सांगितले. याशिवाय न्यायालयाने स्वेच्छा दखल घेऊन अॅड. अभिजित गोसावी यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली. ते न्यायालयाला मदत करत आहेत.

दरम्यान, मागील सुनावणी वेळी पणजी परिसरात तीन ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती सादर करण्यात आली होती. तसेच ही कामे २० जून पर्यंत पूर्ण केली जाईल याची हमी सरकारने उच्च न्यायालयात दिली.

अॅमिकस क्युरी गोसावी यांनी पणजी शहरातील वेगवेगळ्या १३ ठिकाणी खोदलेल्या रस्त्यांची परिस्थिती दर्शविणारे फोटो न्यायालयात सादर केले. या संदर्भात काय स्थिती आहे याची माहिती राज्य सरकारला बुधवार १५ रोजी सादर करण्यास सांगितले आहे. 

हेही वाचा