उपमुख्यमंत्र्यांइतके वजनदार झाले भाजपचे प्रदेशाध्यक्षपद

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक यांच्या नावाची लवकरच घोषणा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
9 hours ago
उपमुख्यमंत्र्यांइतके वजनदार झाले भाजपचे प्रदेशाध्यक्षपद

पणजी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे पक्षाच्या बांधणीसाठी महत्त्वाचे मानले जाते. पक्षाचा अध्यक्ष हाच कार्यकर्त्यांच्या भावना समजून त्यांच्या मदतीला धावणारा असतो. यापूर्वी अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी या पदावर काम केले आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये हे पद मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री असावा, इतके वजनदार झाले आहे. या वजनदार पदाच्या शर्यतीत आता माजी आमदार दामू नाईक यांनी आघाडी घेतली आहे. दोन दिवसांत नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणाही होईल.
काशीनाथ परब, विश्वनाथ आर्लेकर, श्रीपाद नाईक, डॉ. सुरेश आमोणकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, राजेंद्र आर्लेकर, विनय तेंडुलकर आणि सदानंद शेट तानावडे यांनी आतापर्यंत भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आधीचे दोन अध्यक्ष वगळता श्रीपाद नाईक ते विनय तेंडुलकर हे आमदार, खासदार आणि मंत्रीही झाले. सदानंद शेट तानावडे आमदार होते, आता ते राज्यसभा खासदार आणि प्रदेशाध्यक्षही आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत त्यांच्याजागी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षपद फार वजनदार झाले आहे. मुख्यमंत्र्यांनंतर प्रभावी पद म्हणून याच पदावरील व्यक्तीकडे पाहिले जाते. पक्षाची कामे, पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष मिळून काम करतात. त्यामुळे हे पद एखाद्या उपमुख्यमंत्र्यापेक्षा कमी नाही. मनोहर पर्रीकर, सतीश धोंड यांचा पक्षावर प्रभाव असताना प्रदेशाध्यक्षाचा सरकारवर तितका वचक नसायचा. कारण पक्षाचा सगळा कारभार या दोन व्यक्तीच हाताळत होत्या. आमोणकर, पार्सेकर, आर्लेकर आणि तेंडुलकर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारर्किर्दीत भाजपकडे सत्ता आली किंवा सत्ता पुनर्स्थापित झाली. आर्लेकर, पार्सेकर हे प्रदेशाध्यक्ष असताना निर्णय प्रक्रियेत असायचे. पण, त्यावेळी बहुतांशीवेळा पर्रीकर म्हणतात तेच व्हायचे. श्रीपाद नाईक हे गेल्या काही वर्षांत केंद्रातच जास्त सक्रिय राहिले. २०१९ मध्ये पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. त्यावेळी विनय तेंडुलकर प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर २०२० मध्ये सदानंद शेट तानावडे प्रदेशाध्यक्ष झाले. दरम्यानच्या काळात सतीश धोंड यांना पक्षाने पश्चिम बंगालमध्ये पाठवले. म्हणजे पर्रीकर नाहीत आणि सतीश धोंडही नाहीत. आर्लेकर राज्यपाल म्हणून गेले आणि पार्सेकरांनी भाजपशी फारकत घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह तानावडे पक्षाच्या कामात जास्त वजनदार ठरले. आता जो अध्यक्ष होईल तोही अशाच पद्धतीने वजनदार ठरणार आहे.

दामू नाईकच का?
- दामू नाईक हे २००२ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुकांत फातोर्डा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर २०१२, २०१७, आणि २०२२ पर्यंत सलगपणे ते आमदार विजय सरदेसाई यांच्याकडून पराभूत झाले.
- सासष्टीतील प्रदेशाध्यक्ष म्हणून दामू नाईक हे फक्त फातोर्डाच नव्हे, तर नावेली, मडगाव, कुंकळ्ळी अशा सासष्टीतील हिंदूबहुल मतदारसंघांतही भाजपला फायद्याचे ठरू शकतात. पण फातोर्डा हा त्यांचा मतदारसंघ ते गोवा फॉरवर्डकडून परत मिळवू शकतात का, याचे उत्तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मिळेल.
- दामू नाईक हे भंडारी समाजाचे आहेत. भंडारी समाजाची मते प्रत्येक विधानसभा निवडणुकांत निर्णायक ठरत असतात. त्यामुळे भाजपने यावेळी प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाचा विचार केला.                          

हेही वाचा