जीटीडीसीकडून सरकारला ४५ लाखांचा लाभांश

गणेश गावकर : गेल्या नऊ महिन्यांतील आर्थिक परिणाम सकारात्मक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
जीटीडीसीकडून सरकारला ४५ लाखांचा लाभांश

पणजी : गोवा पर्यटन विकास महामंडळाची (जीटीडीसी) सूत्रे हाती घेतल्यापासून महामंडळाला फायदा झाला आहे. माझ्या कार्यकाळात प्रथमच महामंडळाकडून सरकारला ४५ लाख रुपयांचा लाभांश दिलेला आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष गणेश गावकर यांनी दिली.
गोवा पर्यटन मंडळाच्या बैठकीनंतर अध्यक्ष गावकर म्हणाले, २१ एप्रिल २०२२ रोजी मुख्यमंत्र्यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि मी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. सुरुवातीला जेव्हा सरकार स्थापन झाले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्वांना एक मंत्र दिला की, सर्व सरकारी महामंडळे कशी फायदेशीर होतील यासाठी प्रत्येकाने काम करावे. माजी व्यवस्थापकीय संचालक आणि संपूर्ण अधिकाऱ्यांसह महामंडळाच्या संपूर्ण टीमने हा विचार मनात ठेवून त्या दिशेने काम करण्यास सुरुवात केल्याचे गावकर यांनी सांगितले.
२०२२-२३ मध्ये सरकारला ४५ लाख रुपयांचा लाभांश दिला. त्यानंतर पुन्हा २०२३-२४ मध्ये सरकारला ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त लाभांश दिला. गेल्या नऊ महिन्यांतील आर्थिक परिणाम सकारात्मक आहेत आणि त्यामुळे पुढील तीन वर्षांसाठी लाभांश देणे शक्य होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या बिगर आर्थिक महामंडळाने इतका लाभांश दिला आहे, असेही गावकर म्हणाले.
मुख्यमं‌त्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या सहकार्याने आमचे सर्व व्यवस्थापकीय अधिकारी तसेच लहान-मोठे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न केले. महामंडळाचा ताबा घेतल्यानंतर आम्ही ते चांगल्या पद्धतीने चालवले आणि गेल्या दोन वर्षांत रु. ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त लाभांश दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. - गणेश गावकर, अध्यक्ष, गोवा पर्यटन विकास महामंडळ             

हेही वाचा