राज्यातील आणखी सहा वस्तूंना लवकरच जीआय मानांकन!

कोरगुट तांदळासह दोन जातींच्या आंब्यांचा समावेश; जीआय निबंधकांनी मागवली अतिरिक्त कागदपत्रे

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
राज्यातील आणखी सहा वस्तूंना लवकरच जीआय मानांकन!

पणजी : गोव्यातील कोरगुट तांदूळ, मुसराद आणि मांगेलाल आंबा, कोकोनट क्राफ्ट, ताळगावची वांगी आणि काजू अॅप्पल आणखी सहा वस्तूंना जीआय मानांकन मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जीआय निबंधकांनी या सहाही वस्तू परीक्षणानंतर स्वीकारल्या असून, त्यासंदर्भातील अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढील चार ते पाच महिन्यांत या सहा वस्तूंनाही जीआय मानांकन मिळेल, असे विज्ञान-तंत्रज्ञान मंडळाचे अधिकारी दीपक परब यांनी ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.
जीआय मानांकनासंदर्भात गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत गोव्यातर्फे कोरगुट तांदूळ, मुसराद आणि मांगेलाल आंबा, कोकोनट क्राफ्ट, ताळगावची वांगी आणि काजू अॅप्पल या सहा वस्तूंची जीआय मानांकनासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. त्यांचे अर्ज जीआय निबंधकांनी​ स्वीकारलेले असून, त्यासंदर्भात अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासही सांगितले. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव हरकतींसाठी ९० दिवसांसाठी खुला ठेवला जातो. या काळात त्याला कोणीही आक्षेप न घेतल्यास तत्काळ संबंधित वस्तूंना जीआय मानांकन दिल्याचे प्रमाणपत्र जारी केले जाते. त्यामुळे पुढील चार ते पाच महिन्यांत या सहाही वस्तूंना जीआय मानांकन मिळेल, असे परब यांनी नमूद केले. दरम्यान, यापूर्वी राज्यातील खाेला मिरची, हरमल मिरची, काजू फेणी, मयंडोळी केळी, गोवन खाजे, गोवा मानकुराद, गोवा काजू, आगशीचे वांगे, सातशिरा भेंडी, गोवन बेबिंका या वस्तूंना जीआय मानांकन मिळालेले आहे.
जीआय मानांकन म्हणजे काय? महत्त्वाचे कशासाठी?
- एखादे उत्पादन विशिष्ट भागातच घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जीआय मानांकन दिले जाते.
- कोणत्याही उत्पादनाला जीआय मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. शिवाय नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी त्याचा फायदा उत्पादकांना होतो.
- जीआय मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे. कारण वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित केले जाणारे एकच उत्पादन वेगवेगळ्या गुणवत्तेचे असू शकते. त्यामुळे गुणवत्तेची ओळख कायम ठेवण्यासाठी हे मानांकन महत्त्वाचे ठरते.
- जीआय मानांकनामुळे उत्पादकाला अनेक अधिकार प्राप्त होतात. शिवाय भेसळयुक्त उत्पादनाची निर्मिती तसेच विक्री करण्यास आळा बसू शकतो.             

हेही वाचा