विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्स परीक्षेला बसणे होणार शक्य
पणजी : आयआयटी प्रवेशासाठीची जेईई मेन्स परीक्षा व बारावी प्रात्यक्षिक परीक्षेतील काही पेपर्सच्या तारखा एकसारख्या झाल्याने शालान्त मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या विषयीचे सुधारीत परिपत्रक उच्च माध्यमिक विद्यालयांना पाठविण्यात आल्याची माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिली.
जेईई मेन्स परीक्षा २० जानेवारी २०२५ ते ३० जानेवारी २०२५ दरम्यान होणार आहे. आयआयटीत तसेच अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेउ इच्छिणारे बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी जेईई मेन्स परीक्षेला बसतात. या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य व्हावे, यासाठी प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विविध उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा १३ जानेवारीपासून सुरू झाली आहे. १३ जानेवारी ते २० जानेवारीपर्यंत विविध तुकड्यांच्या आधारे त्या, त्या उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा होतील.
२१ ते २४ जानेवारीपर्यंतच्या तारखांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यानंतर जेईई मेन्स परीक्षा झाल्यानंतर १ फेब्रुवारी, ३ फेब्रुवारी आणि ४ फेब्रुवारी या तारखांना परीक्षा होईल. यामुळे जेईई मेन्स परीक्षेला बसणे विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना शक्य होणार आहे.
१६ ते २० विद्यार्थ्यांची तुकडी करून प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते. विज्ञान शाखेसाठी फिजीक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी, संगणक विज्ञान व जोग्राफी (भूगोल) या विषयात प्रात्यक्षिक परीक्षा होते. अधिक विद्यार्थी असलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयांना परीक्षेसाठी अधिक दिवस लागतात.